मुंबई – मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) गणेशोत्सवादरम्यान डिजे, डॉल्बीच्या आवाजावर भाष्य केले होते. यावरून शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांच्यावर टीका केली. ‘एका बड्या नेत्याच्या घरासमोरून मिरवणूक चालली, त्याचा आपल्या नातवाला त्रास होतोय म्हणून बडा नेता भाष्य करेल. नेत्याच्या नातवाचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे, मात्र गोर गरिबाचे मुलही चांगले राहिलं पाहिजे’, असं सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) म्हटलं होते.
यानंतर मनसेच्या शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी सुषमा अंधारे यांना इशारा दिला होता. याच मुद्द्यावरून आता सुषमा अंधारे यांनी मनसेला आव्हान दिले आहे. ठिकाण, वेळ, दिवस तुम्ही ठरवा. मी निशस्त्र यायला तयार आहे, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी मनसेच्या नेत्यांना खुलं आव्हान दिले आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
“भडकले..गुर्गुरले..dj…जाळ..डरकाळी..अरे बापरे.. बाई, ठिकाण , वेळ, दिवस तुम्ही ठरवा. मी नि:शस्त्र एकटी यायला तयार आहे. पण खरं सांगा, नांदेड संभाजीनगरचे बळी याबद्दल तुमच्या आतड्याला अजिबात पिळ पडत नाही का? मी मुद्द्यावर बोलतेय, चिप पब्लिसिटीसाठी लुडबुड का करताय?, ” असा प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी नाव न घेता मनसेच्या शालिनी ठाकरेंवर दिले आहे.
भडकले..गुर्गुरले..dj…जाळ..डरकाळी..अरे बापरे..
बाई,
ठिकाण , वेळ, दिवस तुम्ही ठरवा. मी नि:शस्त्र एकटी यायला तयार आहे.
पण खरं सांगा, नांदेड संभाजीनगर चे बळी याबद्दल तुमच्या आतड्याला अजिबात पिळ पडत नाही का? मी मुद्द्यावर बोलतेय, चिप पब्लिसिटीसाठी लुडबुड का करताय? @ShivSenaUBT_— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) October 7, 2023
काय म्हणाल्या होत्या शालिनी ठाकरे?
काही हिंदू सणांमध्ये डी. जे. व लेझर लाईटमुळे होणारा त्रास याबाबत रोखठोक भूमिका घेऊन राज ठाकरेंनी त्याला विरोध केला. महाराष्ट्रातील जनतेनं, सर्वपक्षीय संवेदनशील व्यक्तींनी त्याचं स्वागत केलं. पण हेच तुम्हाला बहुधा रुचलं नसावं. राज ठाकरेंवर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा तुम्ही केविलवाणा प्रयत्न करत आहात. कुटुंबाला राजकारणात ओढण्याची तुमच्या गटप्रमुखांची सवय तशी जुनीच मग तुमच्यासारखे चेले-चपाटे मागे कसे राहतील?” असा खोचक सवाल शालिनी ठाकरेंनी पत्रातून केला.
“शिल्लक सेनाप्रमुख आजकाल आपल्याकडे दुर्लक्ष करत आहेत म्हणून तुम्ही नैराश्यात आहात त्यामुळेच तुम्ही संबंध नसताना राज ठाकरेंच्या नातवाला राजकारणात ओढलं. हे निंदनीय व निषेधार्ह आहे. आपण याची जाहीर माफी मागितली पाहिजे. आपल्यालाही एक मुलगी आहे. स्वार्थी राजकारणापोटी तिच्याबाबत कुणी अशी विधानं केली तर ती तुमच्या मनाला रुचतील का?” असाही सवाल शालिनी ठाकरेंनी सुषमा अंधारेंना केला होता.