तपासणी अहवाल आल्यानंतर पात्र स्वयंसेवकांना लस देणार
पुणे – सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापाठाच्या “कोव्हिशिल्ड’ या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला ससून, भारती आणि केईएम रुग्णालयात सोमवारी सुरुवात झाली. त्यासाठी स्वयंसेवकांच्या चाचण्या घेण्यात आल्या असून, त्यांचा अहवाल आल्यानंतर पात्र स्वयंसेवकांना लस देण्यात येणार आहे. दरम्यान, आजही आणखी काही स्वयंसेवकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर बुधवारी (दि.23) लस देण्यात येणार आहे.
करोना प्रतिबंधक लस निर्मितीचे काम विविध कंपन्यांकडून सुरू आहे. दरम्यान, ऑगस्टमध्ये “कोव्हिशिल्ड’ लसीच्या चाचण्यांना पुण्यासह देशात प्रारंभ झाला. दुसऱ्या टप्प्यातील लसीची सुरक्षितता तपासण्यात आली. त्याचा अहवाल डाटा सेफ्टी मॉनिटरिंग बोर्डाकडे (डीएसएमबी) पाठविण्यात आला.
दरम्यान, ऍस्ट्राझेनका लसीच्या चाचण्या थांबवण्यात आल्याने भारतात सीरमच्या चाचण्या थांबवण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, इंग्लंडसह भारताच्या डीएसएमबीने चाचण्या सुरू करण्याची शिफारस केली. ती मान्य करत केंद्रीय औषध महानियंत्रकांनी अखेर सीरमला परवानगी दिली.
मागील दोन दिवसांत पुण्यातील तीनही रुग्णालयांनी इच्छुक स्वयंसेवकांची तपासणी केली. त्यातील काहींना अन्य त्रास असल्यामुळे त्यांना लस देण्यात आली नाही.
ससून, भारती आणि वढू येथील केईएम रुग्णालय केंद्रात स्वयंसेवकांच्या करोना आणि अँटिबॉडीजच्या चाचण्या करण्यात आल्या. या दोन्ही चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर स्वयंसेवकांना पहिला डोस टोचण्यात येणार आहे.