पुणे – बांधकामांना परवानगी देताना समुद्र सपाटीपासूनची उंची ठरवून देण्याचे नकाशे हवाई दलाच्या संकेतस्थळावरून काढून टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. अचानक हे नकाशे संकेतस्थळावरून गायब झाले आहेत. त्यामुळे महापालिकेपुढे प्रश्न निर्माण झाला आहे. बांधकाम आराखडा तयार करताना सुधारित की, जुन्या नकाशांनुसार करावे? या गोंधळात महापालिका पडल्याने त्याचा फटका बांधकाम व्यावसायिकांना बसत आहे.
शहराच्या हद्दीत नकाशे मंजूर करताना समुद्र सपाटीपासून जमिनीच्या उंचीबाबतचे प्रमाणपत्र हवाई दलाकडून घेणे स्थानिक स्वराज्य संस्थांना राज्य सरकारने बंधनकारक केले. त्यानुसार हवाई दलाने विमानतळ आणि परिसरात कशा प्रकारे परवानगी द्यावी, यासंदर्भातील “कलर कोडेड झोनिंग’चे नकाशे (सीसीझेडएम) तयार करून एप्रिल 2018 मध्ये महापालिकेस पाठविले होते. हवाई दलाने महापालिकेला पाठविलेल्या या “सीसीझेडएम’ नकाशांमध्ये अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आले होते. परिणामी, पुणे शहरातील शेकडो बांधकामे अडचणीत आली होती.
या नकाशावरून निर्माण झालेल्या गोंधळाबाबत हवाई दल आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या दोन ते तीन वेळा एकत्रित बैठका झाल्या. या बैठकांमध्ये महापालिकेने “सीसीझेडएम’ नकाशांमध्ये झालेल्या चुका हवाई दलाच्या अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्या चुका मान्य करीत नकाशे दुरुस्त करण्यास हवाई दलाने मान्यता दिली होती. त्यानुसार ऑगस्टमध्ये दुरूस्त नकाशे हवाई दलाकडून त्यांच्या संकेतस्थळावरदेखील प्रसिद्ध करण्यात आले. परंतु सुधारित नकाशांसंदर्भात कोणतीही अधिसूचना प्रसिद्ध केली नाही. त्यानंतर हे नकाशे संकेतस्थळावरून काढल्याचे दिसून आले आहे.
“सीसीझेडएम’चे दुरूस्त नकाशे हवाई दलाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होते. आता मात्र ते त्या संकेतस्थळावर दिसत नाहीत. जुनेच नकाशे दिसत आहेत. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तातडीने दुरुस्त नकाशे संकेतस्थळावर प्रसिद्ध करावेत.
– सुधीर कुलकर्णी, नागरी हक्क संस्था