लोणी काळभोर, (वार्ताहर)- मागील काही दिवसांपासून पूर्व हवेलीत कमाल तापमानाचा पारा सातत्याने 40 अंशाच्या जवळपास असल्याने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. परिसरात दुपारी उन्हाचा ताप आणि उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढल्यानंतर घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे. परिणामी शेतात काम करणा-या शेतकरी, शेतमजुर व इतर नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या काही वर्षात हवामानात सातत्याने बदल होत आहेत. कधी उन्हाचे चटके, कधी गारठा, तर कधी अवकाळी पाऊस अशा हवामान बदलांना सामोरे जावे लागत आहे. दुपारी बारा ते चारच्या सुमारास बहुतांश ठिकाणी वर्दळ घटल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे.
या वेळेत कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांकडून उन्हापासून बचावासाठी टोपी, उपरणे, स्कार्प आदींचा आधार घेतला आहे. पूर्व हवेलीत कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. दिवसभर कडाक्याचे ऊन पडत आहे.
यातच उकाडा वाढल्याने दुपारी बाहेर पडणार्यांच्या अंगातून घामाच्या धारा निघत आहे. उन्हाचा कडाका वाढल्यामुळे बाजारपेठेत दुपारनंतर शुकशुकाट जाणवतो. कमाल व किमान तापमान वाढण्यास गेल्या काही दिवसांपासून सुरवात झाली आहे. अधून मधून ढगाळ वातावरण होत आहे. हवामानात वेगाने बदल असल्याने कधी उन्हाचा चटका, कधी गारठा, तर कधी अवकाळी पाऊस अशा हवामान घटनांना सामोरे जावे लागत आहे