लोणी काळभोर, (वार्ताहर) – दौंड तालुक्यातील सहजपूर फाटा येथे एकाला पिस्तुलासह तर पिस्तूल विकणार्याला पिस्तूलासह देलवडी येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे.
अथर्व संदीप जाधव (वय 18, रा. गोंधळेनगर हडपसर, पुणे) व विजय बाळकृष्ण नेटके (रा. देलवडी, ता. दौंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस असा 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दौंड तालुक्यात गस्त घालत होते.
गस्त घालत असताना, पोलिसांना सहजपूर फाटा येथे एकजण गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती खबर्यामार्फत मिळाली. पोलिसांनी सापळा रचून आरोपी अथर्व जाधव याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तूल मिळून आले. अधिक चौकशी केली असता, हे पिस्तूल त्याचा मित्र विजय नेटके याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी विजय नेटके याला ताब्यात घेतले असता, त्याच्याकडेही एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस असा एकूण 35 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.