लोणी काळभोर, (वार्ताहर) – प्रीमिनेंट एज्युकेशन अॅण्ड रिसर्च असोसिएशन (पेरा) या खासगी विद्यापीठांच्या संघटनेच्या वतीने यंदा दि. 24, 25 व 26 मे रोजी सीईटी परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस 19 मे असून, परीक्षेचा निकाल 31 मे रोजी घोषित करण्यात येणार आहे, अशी माहिती पेराचे अध्यक्ष व एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी दिली.
या परीक्षेसंदर्भात माहिती देण्यासाठी एमआयटी आर्ट, डिझाइन व टेक्नालॉजी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रा. डॉ. कराड बोलत होते. याप्रसंगी जेएसपीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. बी. अहुजा, डी. वाय. पाटील विद्यापीठ आंबीच्या कुलगुरू डॉ. सायली गणकर, जी. एच. रायसोनी स्किल टेक विद्यापीठाचे कुलगरू डॉ. एम. यू. खरात, प्र कुलगुरू डॉ. मोहित दुबे, पेराचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. हणमंत पवार, स्ट्रॅटेजिक सल्लागार प्रा. डॉ. सुराज भोयर आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. कराड म्हणाले, राज्यात स्थापित असलेल्या 25 नामांकित खासगी विद्यापीठांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम, जसे की इंजीनियरिंग, बायोइंजीनियरिंग, फूड टेक्नोलॉजी, मरीन इंजीनिअरिंग, अॅग्रो इंजिनिअरिंग, फार्मसी, फाईन आर्ट्स, डिझाइन, मॅनेजमेंट, विधी (लॉ) आणि आर्किटेक्चर या विषयांसाठी प्रवेश घ्यायचा असेल तर ही परीक्षा देणे अनिवार्य आहे.
या परीक्षेच्या आधारावर विद्यार्थ्यांना खासगी विद्यापीठांमध्ये प्रवेश प्राप्त होणार आहे. मागील वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील पेरा-सीईटी कंम्पुटर बेस्ड टेस्ट(सीबीटी) द्वारे घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी दि. 19 मे पर्यंत ऑनलाईन नावनोंदणी करावी.
पेरा अंतर्गत असलेली विद्यापीठे
एमआयटी-एडीटी, एमआयटी-डब्ल्यूपीयू, संजय घोडावत युनिव्हर्सिटी, संदीप युनिव्हर्सिटी, स्पायसर, डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, एमजीएम युनिव्हर्सिटी, सिंबायोसिस स्किल्स अॅण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, सोमैया विद्याविहार युनिव्हर्सिटी, विजयभूमी युनिव्हर्सिटी,
विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, डी. वाय. पाटील अॅग्रीकल्चर अॅण्ड टेक्निकल युनिव्हर्सिटी, श्री बालाजी युनिव्हर्सिटी, फ्लेम युनिव्हर्सिटी, डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटी, जेएसपीएम युनिव्हर्सिटी, एनआयसीएमएआर युनिव्हर्सिटी, पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटी, डीईएस पुणे विद्यापीठ, एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ, युनिव्हर्सल एआय विद्यापीठ, जी. एच. रायसोनी स्किल टेक विद्यापीठ आणि संजीवनी विद्यापीठ.