वॉशिंग्टन : जगातील सर्वात मोठे आणि घनदाट जंगल मानण्यात येणाऱ्या ॲमेझॉनच्या जंगलात सर्वात उंच झाड सापडले आहे. या झाडाची उंची एखाद्या पंचवीस मजली उंच इमारती एवढी असून त्या झाडाचे वय 400 ते 600 वर्ष असावे असा संशोधकांचा अंदाज आहे. या झाडाची उंची 290 फूट असून रुंदी 32 फूट आहे.
संशोधकांच्या एका टीमने तब्बल तीन वर्षे प्रयत्न केल्यानंतर या झाडाचा शोध लावला आहे. हे महाकाय झाड एंजेलीम वर्मीलो या प्रजातीचे आहे. संशोधकांच्या टीमने 12 ते 25 सप्टेंबर या कालावधीमध्ये जलमार्गाने 250 किलोमीटर प्रवास करून आणि डोंगराळ भागात पायी 20 किलोमीटर प्रवास करून या झाडाचा शोध लावला.
2019 मध्ये एका सॅटेलाइट फोटोमध्ये हे झाड संशोधकांच्या नजरेस आले होते त्यानंतर या झाडाचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. विविध कारणांनी आणि अनेक संशोधक आजारी पडल्याने ही मोहीम रखडली होती. अखेर गेल्या महिन्यामध्ये ही शोध मोहीम हाती घेण्यात आली आणि अथक परिश्रमानंतर या झाडाचा शोध घेण्यात आला.
एंजेलीम वर्मीलो या प्रजातीच्या झाडाचे लाकूड अतिशय किमती असते. ज्या भागामध्ये हे झाड सापडले त्या प्रदेशांमध्ये असे अनेक किमती वृक्ष असून त्याचे रक्षण करण्याची गरज असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे.