पिंपरी, दि. 9 (प्रतिनिधी) – स्वतंत्र आयुक्तालय स्थापन होऊन बराच काळ उलटल्यानंतरही पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांचे मुख्यालय अडचणींच्या गर्तेत आहे. जागेअभावी अनेक प्रश्न चार वर्षांनंतरही प्रलंबित आहेत. मुख्यालयात जागा नसल्याने महत्वाचे साहित्य व्यवस्थित ठेवता येत नाही. त्यातच भर म्हणजे राखीव पोलीस निरीक्षक यांना बसण्यासाठी साधी केबिन देखील नाही. राखीव पोलीस निरीक्षक चक्क बाहेर बसून कारभार करीत आहेत. त्यामुळे कुणी जागा देतं का जागा? असे म्हणण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.
शहर पोलिसांचे मुख्यालय निगडी येथे आहे. मुख्यालयाला जागा नसल्याने महापालिकेच्या शाळेला तात्पुरते मुख्यालय बनविले आहे. शाळेच्या इमारतीमधूनच मुख्यालयाचा कारभार चालविला जात आहे. मुख्यालयात शस्त्रे आणि दारुगोळा ठेवण्यासाठी चोख सुरक्षा असणे आवश्यक आहे. शाळेच्या इमारतीत त्याची सोय केल्याने इतर साहित्य ठेवण्यासाठी जागा नाही. मुख्यालयाचा कारभार पाहणारे राखीव पोलीस निरीक्षक यांना बसण्यासाठी एक केबिन आहे. मात्र त्यातही साहित्य ठेवल्याने राखीव पोलीस निरीक्षक उघड्यावर टेबल मांडून बसत आहेत.
बहुतांश पोलीस स्टेशन, वाहतूक विभाग आणि गुन्हे शाखेच्या पथकांमध्ये अनुभवी, काम करणाऱ्या पोलिसांची वानवा आहे. मुख्यालयात सध्या सुमारे 900 पोलीस आहेत. एखाद्या मोठ्या पोलीस ठाण्याच्या जवळपास पाचपट ही संख्या आहे. पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांची वानवा असताना देखील मुख्यालयातील पोलिसांना मात्र पोलीस स्टेशन दिले जात नाही. अनेक कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्यासह गुन्हे शाखेतही काम करण्याची इच्छा असल्याचे कर्मचारी खासगीत बोलतात. पुढील काही महिन्यांत प्रशिक्षण संपवून 720 पोलीस कर्मचारी दाखल होणार आहेत. त्यामुळे आता मुख्यालयात असलेल्या या पोलिसांना लवकर वर्ग करणे गरजचे आहे.
मैदानाविना परेड होईना
पोलीस मुख्यालयातील पोलिसांची नियमित परेड होणे गरजेचे असते. महापालिकेच्या निगडी येथील शाळेच्या काही गुंठ्यांच्या मैदानात परेड करणे शक्य होत नाही. सात प्लाटूनची परेड होणे आवश्यक आहे. मात्र जागेअभावी केवळ दोन प्लाटूनची परेड केली जाते. मुख्यालयासाठी सुमारे 20 एकर जागेची आवश्यकता आहे. देहूगाव नगरपंचायतच्या गायरानातील जागेसाठी पिंपरी चिंचवड पोलीस प्रयत्न करीत आहेत. तिथे पोलीस मुख्यालय करण्याचे प्रस्तावित आहे.
राखीव पोलीस निरीक्षक पदही रिक्त
पोलीस मुख्यालयाचा कारभार राखीव पोलीस निरीक्षकांकडून हाकला जातो. सध्या या पदावर पोलीस निरीक्षक राजकुमार माने हे कार्यरत आहेत. मात्र ते सोलापूर शहर येथे नेमणुकीस आहेत. मुख्यालयाची गरज आणि माने यांचा अनुभव पाहता त्यांना पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालयात संलग्न करण्यात आले आहे. मुख्यालयाच्या विविध प्रश्नांबाबत त्यांच्याकडून पाठपुरावा केला जात आहे.