पिंपरी, दि. 9 (प्रतिनिधी) -पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागाकडे काम करणाऱ्या 79 शिक्षण सेवकांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आलेला असला तरी आयुक्त शेखर सिंह यांनी त्यांना नियमीत वेतन श्रेणीचे आदेश देण्यास सकारात्मकता दाखविली आहे. त्यामुळे पदवीधर शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला यश आले असून यंदा सर्वच शिक्षण सेवकांची दिवाळी गोड होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागांतर्गत कार्यरत 79 प्राथमिक शिक्षण सेवकांचा तीन वर्षे सेवा कार्यकाळ समाधानकारक पूर्ण झाला आहे. मागील तीन वर्षांपासून शिक्षण सेवक शासन निर्णयानुसार केवळ सहा हजार रुपये एवढ्या तुटपुंज्या मानधनावर काम करीत आले. 17 सप्टेंबरअखेर सर्वच शिक्षण सेवकांचा कालावधी पूर्ण झाला. त्यांना मिळणारे सहा हजार रुपये मानधनही नियमानुसार बंद झाले. दरम्यान, शिक्षण सेवकांना नियमिततेचे आदेश न मिळाल्यामुळे ऐन सनासुदीच्या काळात त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
यापूर्वी महापालिकाअंतर्गत नियमित होणाऱ्या शिक्षण सेवकांना शिक्षण विभागाकडून साधारण सात ते आठ महिन्यात नियमिततेचे आदेश देण्यात आले. मात्र, सध्याच्या 79 शिक्षण सेवकांना आदेश मिळण्यास विलंब झाला. त्यांना लवकरात लवकर आदेश मिळावेत, यासाठी पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मनोज मराठे यांनी आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप यांच्यासह आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.
आमदारांच्या मध्यस्थीने प्रश्न मार्गी
आमदार लांडगे यांनी पत्राद्वारे शिक्षण सेवकांचे दिवाळीपूर्वी आदेश काढण्याची सूचना आयुक्तांना केली. आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे – पाटील, उपायुक्त संदीप खोत, प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. शिक्षण सेवकांना नियमीत वेतन श्रेणीचे आदेश दिवाळीपूर्वी देण्याबाबत आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे शिक्षण सेवकांची यंदाची दिवळी गोड होणार आहे, असे पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मनोज मराठे यांनी सांगितले.