राजगुरूनगर – शहरालगत असलेल्या सांडभोरवाडी (तिन्हेवाडी, ता. खेड) येथील करोना संशयित व्यक्ती करोना बाधित नसल्याची अधिकृत माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी गुरुवारी (दि. 30) दिली. संशयित रुग्णाच्या स्वॅब तपासणी निगेटिव्ह आल्याने तिन्हेवाडी व परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
तिन्हेवाडीतील संबंधित व्यक्ती पुणे येथे नोकरीला आहे. तेथील एक अधिकारी करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्याच्या संपर्कात आल्याने या व्यक्तीला व कुटुंबातील सदस्यांना प्रशासनाने मंगळवारी (दि. 28) सायंकाळी विलगिकरणात ठेवले होते. त्याचा रिपोर्ट गुरुवारी सकाळी मिळाला. संशयित म्हणून या व्यक्तीला प्रशासनाने ताब्यात घेतल्यानंतर राजगुरूनगर शहर परिसरात तसेच तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी गावात सुरू असलेले लॉकडाऊन निर्बंध यापुढेही कडेकोट पाळले जातील असे सरपंच अरुण थिगळे यांनी सांगितले.
नव्याने 19 डॉक्टर उपलब्ध
खेड तालुक्यात करोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात जिल्हा परिषदे आरोग्य विभागाकडून नव्याने 19 डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्यांच्या माध्यमातून तालुक्यातील 10आरोग्य केंद्र व उपकेंद्रांतर्गत गावांमध्ये आरोग्य सेवा व करोना विषाणू संसर्ग बाबत मार्गदर्शन व उपाययोजना करण्यात येत आहेत.