नवी दिल्ली – छत्तीसगडमधील मनी लॉन्डरिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सक्तवसुली संचलनालयाला सबुरीने कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. याचिकाकर्ते अनिल आणि यश तुतेजा यांच्याविरोधात सक्ती न करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने ‘ईडी’ला केली आहे.
प्रशासकीय अधिकारी अनिल तुतेजा आणि त्यांचे पुत्र यश तुतेजा यांनी “पीएमएलए’ कायद्यांतर्गत “ईडी’कडून कोणालाही चौकशीसाठी बोलावण्याच्या अधिकारांना आव्हान दिले आहे.’ईडी’कडून चौकशीच्या नावाखाली छळ केला जात असल्याचा दावाही त्यांनी केला असून अनिल तुतेजा यांना बजावण्यात आलेले समन्स रद्द करण्याची मागणीही केली आहे.
“ईडी’ 2019 ते 2022 दरम्यान झालेल्या दारू घोटाळ्याची चौकशी करत आहे. या घोटाळ्यामध्ये अनेक प्रकारे भ्रष्टाचार झाला. “सीएसएमसीएल’ने त्यांच्याकडून खरेदी केलेल्या दारूच्या प्रत्येक प्रकरणात डिस्टिलर्सकडून लाच घेतली. यामुळे राज्य सरकारचा मोठा महसूल बुडाला आणि मद्य उत्पादकांना मोठा फायदा झाल्याचा आरोप आहे.