इस्लामाबाद :- आर्थिक अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानला चीनकडून 600 दशलक्ष डॉलरचे अतिरिक्त कर्ज मिळाले आहे, अशी माहिती पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी दिली आहे.
चीनने गेल्या 3 महिन्यांत पाकिस्तानला दिलेल्या 5 अब्ज डॉलरच्या कर्जाव्यतिरिक्त हे कर्ज आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदतीचे पॅकेज मिळण्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत. पाकिस्तानला आर्थिक दिवाळखोरी जाहीर करण्याची वेळ येऊ नये, म्हणून चीनने ही मदत केली आहे.
पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून 3 अब्ज डॉलरच्या मदतीचा पहिला हप्ता 30 जून रोजी मिळाला आणि नंतर 1.2 अब्ज डॉलरचा प्रारंभीचा आगाऊ हप्तादेखील वितरित करण्यात आला आहे. चीनने केलेल्या मदतीमुळे आता पाकिस्तानच्या विदेशी गंगाजळीचे प्रमाण 600 दशलक्ष डॉलरपर्यंत पोहोचले आहे, असेही शरीफ म्हणाले आहेत.
पाकच्या विदेशी गंगाजळीचे प्रमाण वाढते आहे. मात्र, आम्हाला ते कर्जाच्या माध्यमातून उभे करायचे नाहीत. तर स्वतःच्या उत्पन्नाच्या आधारे उभे करायचे आहेत, असे शरीफ एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
“आयएमएफ’चे बेलआऊट पॅकेज आणि चीनच्या कर्जाव्यतिरिक्त पाकिस्तानला सौदी अरेबियाकडून 2 अब्ज डॉलर, “युएई’कडून 1 अब्ज डॉलरची मदत मिळाली आहे.