मुंबई – भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला असून हा मुद्दा विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही गाजला. या प्रकरणाची सखोल आणि उच्च स्तरावर चौकशी होईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
फडणवीस म्हणाले की, जो विषय मांडला आहे तो गंभीर आहे. राजकारणात अनेक प्रसंग येत असतात. माझे म्हणणे आहे की माझ्याकडे पुरावे द्या. कोणालाही पाठिशी घालणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. कुठलेही प्रकरण दाबले जाणार नाही. सखोल आणि वरिष्ठ स्तरावरील चौकशी केली जाईल.
गृहमंत्र्यांनी तात्काळ त्यांची सुरक्षा काढावी- परब
ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांची सुरक्षा काढण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, काल एका चॅनलवर भाजपच्या माजी खासदारांचा व्हिडीओ समोर आला आहे. बदनामी काय असते याचा मी साक्षीदार आहे. मुलाबाळांना केंद्रीय यंत्रणा बोलावते आणि घाणेरडे प्रश्न विचारते.
यामुळे प्रचंड बदनामी होत असते. ज्या खासदाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याने अनेकांचे आयुष्य बदनाम केले आहे. माझी मागणी आहे की ईडी, सीबीआय नको थेट रॉची चौकशी मागे लावा. त्यांनी आज जे पत्र दिले आहे त्यामध्ये त्यांनी हा व्हिडीओ खोटा आहे असे कुठेही म्हटले नाही. म्हणजेच त्यांनीच या चित्रफितीची सत्यता स्पष्ट केली आहे. त्यामुळे, तात्काळ गृहमंत्र्यांनी किरीट सोमय्या यांची सुरक्षा काढावी.