सिग्नलवर वाहनचालकांची अडचण : दंडाचीही भीती
पुणे – वाहतूक पोलिसांच्या “कॉप-फ्री जंक्शन’ मोहिमेचा चांगला प्रभाव पडत असून, सीसीटीव्ही चलनाच्या भीतीने अनेक “झेब्रा क्रॉसिंग’ च्या मागे उभे राहण्याला प्राधान्य देत आहेत. मात्र शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवरील झेब्रा क्रॉंसिग धूसर झाले आहेत, तर काही ठिकाणी झेब्रा क्रॉसिंगच नाहीत. अशावेळी थांबायचे तरी कुठे? असा प्रश्न वाहनचालक उपस्थित करत आहेत.
वाहतूक पोलिसांच्या “कॉप-फ्री जंक्शन’ मोहिमेअंतर्गत बहुतांश भागामध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. विविध चौकांमध्ये, रस्त्यावरील वाहनांवर या कॅमेराद्वारे “वॉच’ ठेवून झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे केल्यास थेट “ई-चलन’ वाहनचालकाला पाठवण्यात येते. त्यामुळे अनेक वाहन चालकांमध्ये याबाबत भीती निर्माण झाली असून, वाहनचालक स्वत:हून झेब्रा क्रॉसिंगच्या पाठीमागे वाहने उभी करतात. मात्र, शहराच्या मध्यवर्ती भागातील मोठ्या प्रमाणावर रहदारी असणाऱ्या रस्त्यांवरील झेब्रा क्रॉसिंगच गायब झाल्याचे चित्र आहे. यामुळे पादचाऱ्यांसह वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. तर काही ठिकाणी दोन वेळा झेब्रा क्रॉसिंगची आखणी केली असल्याने कोणत्या झेब्रा क्रॉसिंगच्या पूर्वी थांबायचे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. यावर मात्र वाहतूक पोलीस प्रशासन कोणतीही ठोस भूमिका घेण्यास तयार नसून नागरिकांना भुर्दंड सोसावा लागत आहे.
अनेक ठिकाणी अशीही स्थिती
वाहतूक नियमांबाबत वारंवार प्रबोधन केले जाते. यासाठी वाहतूक शाखेसह सामाजिक संस्थादेखील प्रयत्न करत आहे. मात्र शहरातील अनेक वाहनचालकांना “झेब्रा क्रॉसिंग’च्या नियमांचा विसर पडला असल्याचे दिसते. दंडाला न जुमानता अनेक वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगवर उभे राहतात. झेब्रा क्रॉसिंगवर उभ्या राहणारे बेशिस्त वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे असणाऱ्या पहिल्या ओळीच्या मागे वाहन उभे करणे आवश्यक असल्याच्या नियम विसरल्याचे चित्र आहे. अनेक चौकांतून उजवी किंवा डावीकडे वळण्यासाठी, “यू-टर्न’ घेण्यासाठी नागरिक सर्रास झेब्रा क्रॉसिंगवर उभे राहतात. बेशिस्त नागरिकांमुळे विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.