प्रदीप गारटकर : इंदापुरात पत्रकार दिन उत्साहात
रेडा – इंदापूर तालुक्यातील पत्रकारांचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत; मात्र हे प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून लागेल ते सहकार्य देण्याची भूमिका घेतली जाईल, अशी ग्वाही पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने पत्रकार दिनाचे आयोजन नुकतेच इंदापूर पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी गारटकर बोलत होते. पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष नीलकंठ मोहिते, उपाध्यक्ष संदीप सुतार, सचिव सागर शिंदे, ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर गलांडे, यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, इंदापूर पंचायत समितीच्या सभापती पुष्पा रेडके, पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर पवार, नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगण, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, शिवसेना तालुका प्रमुख नितीन शिंदे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ चंदनशिवे, गोकुळ टंगसाळे, बाळासाहेब सुतार यांच्यासह सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.
यावेळी पेपर विक्रेते भीमाशंकर जाधव, महेश स्वामी यांचा पत्रकार संघाच्या वतीने विशेष सन्मान पार पडला. प्राध्यापक सुनील मोहिते यांचे धाडसी पत्रकारिता या विषयावर व्याख्यान पार पडले. सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी तर सोमनाथ ढोले यांनी आभार मानले.