कंपनीची मंगळवारी बैठक : महत्त्वाच्या विषयांवर होणार चर्चा
पुणे – पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्थापन करण्यात आलेल्या “पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड कंपनी’ या विशेष नियोजन प्राधिकरणा’च्या संचालकांची बैठक मंगळवारी (दि.14) होणार आहे. या बैठकीत विमानतळासाठीचा आराखडा, भूसंपादन, त्यासाठी लागणार निधी आदी विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
पुरंदर येथील नियोजित आंरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यास राज्य सरकारकडून यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला (एमएडीसी) “विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून नियुक्त करण्यात होती. मध्यंतरी या प्राधिकरणाचे विस्तारिकरण करत त्यामध्ये सिडको, पीएमआरडीए आणि एमआयडीचा समावेश करण्यात आला. तसेच नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या या संस्थांचस हिस्सादेखील निश्चित करून देण्यात आला होता. त्यानुसार या एसपीव्हीमध्ये सर्वाधिक 51 टक्के वाटा हा सिडकोचा, तर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचा 19 टक्के आणि पीएमआरडीए व एमआयडीसीचे प्रत्येकी 15 टक्के हिस्सा असणार आहे.
या विस्तारित विशेष नियोजन प्राधिकरणाची पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनी या नावाने कंपनी स्थापन करण्यास एमएडीसीकडून कंपनी कायद्यानुसार अर्ज करण्यात आला होता. त्यास काही महिन्यांपूर्वी मान्यता मिळाली. त्यामुळे विमानतळासंदर्भातील सर्व कामकाज या कंपनीमार्फत केले जात आहे.
ही कंपनीस मान्यता मिळाल्यामुळे लवकरच या कंपनीचे अध्यक्षपासून ते संचालक मंडळाची नियुक्ती करणे, कंपनीच्या नावाने स्वतंत्र बॅंक खाते उघडणे, कंपनीतील हिस्सेदार असलेल्या सिडको, पीएमआरडीए, एमआयडीसी आणि एमएडीसीकडून त्यांच्या वाट्याची रक्कम टप्याटप्याने जमा करणे, भूसंपादनाबाबतचे पॅकेजला मान्यता देणे आदी कामे केली जाणार आहेत.