सविंदणे – शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी महावितरण उपकेंद्रातील तब्बल अठरा ट्रान्सफॉर्मर वर्षभरात चोरीला गेले आहेत. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होऊनही एकाही गुन्ह्याची उकल केली नाही. त्यामुळे ट्रान्सफार्मर चोरट्यांचा तपास गुंडाळल्याची चर्चा पश्चिम भागात जोर धरू लागली आहे.
शिरूर तालुक्यात वर्षभरात ट्रान्सफार्मर चोरीच्या घटना वाढल्या आहेत. ट्रान्सफार्मरमधील ऑईल, तांब्याच्या तारा काढून त्याची विक्री करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे व महावितरणचे नुकसान होत आहे. ट्रान्सफार्मरमधील तांब्याची तार चोरीला गेल्यानंतर महावितरणचे अधिकारी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्याचे काम करतात.
परंतु त्यानंतर पोलिसांकडून तपासाची चाके रुतली जात आहेत. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उमटले आहेत. एकीकडे ट्रान्सफार्मर चोरीला गेल्यास किंवा जळाल्यास लवकर बसवले जात नाही. अशी महावितरणची अवस्था झाली आहे. चोरीला लगाम घाला, अशी मागणीही होत आहे.