पुणे – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीमध्ये निवडणुका लढविण्यात आल्या. ही युती झाल्यामुळे महापालिकेतही भाजपकडून शिवसेनेला अंदाजपत्रकात वाढीव निधी देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, निवडणूक निकालानंतर भाजप आणि शिवसेना युती तुटल्याने आता भाजपने शिवसेनेला फटकारण्यास सुरुवात केली असून निधी देण्यास नकार दिला आहे.
बुधवारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र, यावेळी भाजपकडून निधी देण्यास असमर्थता दर्शविली. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेत युती होईल का नाही याबाबत शंका होती. मात्र, युती झाल्यानंतर राज्यात शिवसेनेने भाजपसोबत काम केले.
त्यानंतर महापालिकेतही हे दोन्ही पक्ष एकत्र आले. त्यावेळी शिवसेनेने अनेक निर्णयावर भाजपच्या बाजुने मतदान केले. तर लोकसभेसाठी पुण्यातून भाजपचा खासदार विक्रमी मतांनी निवडून आल्याने शिवसेनेने पालिकेत नगरसेवकांना अंदाजपत्रकात वाढीव निधी तसेच सत्तेत काही वाटा देण्याची मागणी केली. त्यासाठी भाजपने तयारीही दर्शविली. त्यानंतर 6 महिन्यांने झालेल्या विधानसभा निवडणुका हे दोन्ही पक्ष युतीत लढले. मात्र, निकालानंतर युती तुटून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. त्याचा राग शहर भाजपकडून पुण्यातही काढला जात आहे.
शिवसेनेला आधी दिलेल्या शब्दानुसार हा जादा निधी द्यावा, अशी मागणी करण्यासाठी शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्यासह शिवसेना नगरसेवक महापौर मोहोळ यांच्या भेटीला गेले. मात्र, भाजपकडून वर्गीकरण न करण्याचा धोरणात्मक निर्णया घेतल्याचे कारण पुढे करत त्यास नकार दिला आहे. त्यामुळे शिवसेना नगरसेवक चांगलेच संतापले असून त्याचे पडसाद गुरुवारी झालेल्या मुख्यसभेतही उमटले.
“तुमच्यावर विश्वास ठेवूनच आमची वाट लागली, आता आम्हाला सांगू नका’
गुरुवारी मुख्य सभेत शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी सभागृहात चर्चा करण्यासाठी सर्वांना संधी द्यावी, अशी मागणी केली. यावेळी माजी सभागृह नेते श्रीनाथ भीमाले यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संतापलेल्या सुतार यांनी हात जोडून भीमाले यांना सुनावले. “तुमच्यावर विश्वास ठेवूनच आमची वाट लागली, आता आम्हाला सांगू नका’ असे सुनावले.