पुणे- सहकारनगर येथील एका बंगल्यातून दुर्गंध येतोय म्हणून शेजारच्यांनी त्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यावेळी तपास केला असता, बंगल्यामध्ये त्यांना मुलाचा मृतदेह आढळला. तर त्याची आई बेशुद्ध अवस्थेत बाथरूममध्ये पडली होती. किमान तीन दिवसांपासून हे दोघेही घरातच पडून असल्याचा अंदाज आहे.
सहकारनगर भाग-दोनमधील शिरीष सोसायटीमधील एका बंगल्यात हा प्रकार घडला आहे. संबंधित मृत व्यक्तीचे आडनाव सदावर्ते असून त्यांचे वय अंदाजे 50 असल्याची माहिती मिळाली आहे. तर, आईचे वय 90 असण्याचा अंदाज आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या मदतीने घराचे दार तोडून आत गेलो असता सदावर्ते यांचा मृतदेह आढळून आला.
बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या वृद्धेला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदावर्ते यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे त्यांचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.
या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी सदावर्ते यांच्या बहिणींना दिली होती. त्यांनी पुण्यात राहत असलेल्या बहिणीला याबाबत कळवले. त्यानुसार त्या व त्यांचे पती घरी गेल्यानंतर त्यांना हा प्रकार समजला. सदावर्ते यांचे लग्न झालेले नव्हते. त्यांना दारूचे व्यसन होते. तर त्यांच्या आईला पोटाचा विकार आहे, अशी माहिती त्यांच्या नातेवाइकांनी पोलिसांना दिली आहे.