शारजा – कर्णधार महेंद्रसिंग धोनी व फाफ डुप्लेसी यांनी केलेली अखेरच्या काही षटकांतील आक्रमक फलंदाजी चेन्नई सुपर किंग्ज संघाला पराभवापासून वाचवू शकली नाही. राजस्थान रॉयल्सने हा सामना 16 धावांनी जिंकून स्पर्धेत विजयी सलामी दिली.
तत्पूर्वी, यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याने केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात 216 धावांचा डोंगर उभा केला. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकत राजस्थानला फलंदाजी दिली. हा त्याचा निर्णय चुकीचा ठरला.
या सामन्यात पदार्पण केलेल्या यशस्वी जयस्वाल लवकर बाद झाल्यानंतर कर्णधार स्टिव्ह स्मिथ व संजू सॅमसन यांनी चेन्नईच्या गोलंदाजीचा पालापाचोळा केला. सॅमसन जास्त आक्रमक होता. त्याने केवळ 19 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरही त्याचे आक्रमण कमी झाले नाही. त्याने स्मिथच्या साथीत दुसऱ्या गड्यासाठी 121 धावांची भागीदारी केली व संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. शतक पूर्ण करण्याची संधी असलेला सॅमसन मात्र उंचावरून फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्याने अवघ्या 32 चेंडूत 9 उत्तुंग षटकार व 1 चौकार फटकावताना 74 धावांची स्फोटक खेळी केली.
दुसरीकडे संयमी स्मिथनेही अर्धशतक पूर्ण केले. सॅमसन बाद झाल्यावर डेव्हिड मिलर व रॉबिन उथप्पा यांनी साफ निराशा केली. सातत्याने किफायतशीर गोलंदाजी करणारा रवींद्र जडेजा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याच्या 4 षटकांत तब्बल 40 धावा काढल्या गेल्या.
संघाच्या पावणेदोनशे धावा फलकावर लागल्यावर आणखी आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात स्मिथही 47 चेंडूत 4 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 69 धावा करत बाद झाला. त्यानंतर ठरावीक अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत असतानाच जोफ्रा आर्चरने केवळ 8 चेंडूत 4 षटकार फटकावताना 27 धावांची खेळी केली व संघाला द्विशतकी धावांची मजल मारून दिली.
अखेरचे षटक लुंगी एन्जीडीने टाकले व ते अत्यंत महागडे ठरले. त्याने दोन नोबॉल व एक वाइड टाकताना एकूण 9 चेंडूंचे षटक टाकले. 19 व्या षटकांत राजस्थानच्या 186 धावा झाल्या होत्या. एन्जीडीने अखेरच्या षटकात तब्बल 30 धावा दिल्या. करोनाची बाधा झालेला महाराष्ट्राचा नवोदित खेळाडू ऋतुराज गायकवाड याच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्याने त्याला या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स – 20 षटकांत 7 बाद 216 धावा. (संजू सॅमसन 74, स्टिव्ह स्मिथ 69, जोफ्रा आर्चर 27, सॅम कुरेन 3-33)
चेन्नई सुपर किंग्ज – 20 षटकांत 6 बाद 200 धावा. (फाफ डुप्लेसी 72, महेंद्रसिंग धोनी 29, राहुल तेवतीया 3-37)
स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील ठळक घडामोडी
- स्पर्धेला दुखापतींचे ग्रहण
- ईशांत शर्मा, आर. अश्विन, निशेल मार्श, ड्वेन ब्राव्हो हे प्रमुख खेळाडू जायबंदी
- यजुवेंद्र चहलमुळे फिरकी गोलंदाजांना आशा
- वेगवान खेळपट्टीवरही चहल यशस्वी
- रोहित शर्मा व विराट कोहलीच्या अपयशाची चिंता
- मैदानावरील पंचांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह
- पर्याय असूनही तिसऱ्या पंचाचा हस्तक्षेप नाही
- बीसीसीआयकडे पहिल्या तीन सामन्यांतच पंचांबाबत तक्रार
- बॉलपिकर्सला परवानगी देण्याची संघांची मागणी