नवी दिल्ली : देशात सध्या लसीकरणाला वेग आला आहे. त्यातच आता ज्या लोकांनी आतापर्यंत करोनाचा एकच डोस घेतला आहे त्या लोकांमध्ये डेल्टा व्हेरिएंटविरोधात कमी अॅन्टिबॉडी तयार झाल्या आहेत. त्यामुळे करोना लसीच्या दोन डोसमधील अंतर जास्त असेल तर त्यामुळे शरीरात कमी अॅन्टिबॉडी तयार होत आहेत. यावर उपाय म्हणजे दोन डोसमधील अंतर कमी करणे. हे अंतर कमी असल्यास करोनाची लस ही डेल्टा व्हेरिएंटविरोधात अधिक प्रभावी ठरेल असा दावा सायन्स नियतकालिक द लॅन्सेट ने केला आहे.
अमेरिकन लस फायझर ही करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटविरोधात कमी प्रभावी असल्याचे द लॅन्सेटने आपल्या अभ्यासात सांगितले आहे. फायझरचा एक डोस हा करोना विरोधात 79 टक्के प्रभावी आहे, पण डेल्टा व्हेरिएंटविरोधात केवळ 32 टक्के प्रभावी असल्याचे समोर आले आहे.
या अभ्यासात असंही सांगण्यात आलं आहे की, लोकांना लवकरात लवकर करोनाची लस द्यावी. ज्यांना करोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे त्यांना दुसरा डोस हा कमी अंतराने द्यावा. त्यामुळे या डेल्टा व्हेरिएंटविरोधात प्रतिकार शक्ती विकसित होऊ शकेल.
भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार केला आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत रुग्णांची संख्या ही मोठी होती. तसेच मृतांची संख्याही अधिक होती. भारतातील करोनाच्या या दुसऱ्या लाटेला डेल्टा व्हेरिएंट जबाबदार असल्याचे सांगण्यात येत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने भारतात सापडलेल्या कोरोना व्हायरसचे नामकरण केले आहे. भारतात सापडलेला B.1.617.1 हा कोरोना व्हेरिएंट ‘कप्पा’ आणि B.1.617.2 हा व्हेरिएंट आता ‘डेल्टा’ या नावाने ओळखला जाणार आहे. हे दोन व्हेरिएंट सर्वप्रथम भारतात सापडले होते. त्यानंतर सध्या 44 हून जास्त देशांत त्यांचा प्रसार झाला आहे.
यामध्ये डेल्टा हे व्हेरिएंट कप्पाच्या तुलनेत आणि जगातील इतर व्हेरिएंटच्या तुलनेत 50 टक्के जास्त वेगाने पसरत असल्याचे समोर आले आहे. भारतातील दुसऱ्या लाटेला प्रामुख्याने डेल्टा हा व्हेरिएंट जबाबदार आहे. त्यामुळे मृतांची सख्या मोठ्या प्रमाणात वाढली. देशातील जवळपास प्रत्येक राज्यात हा व्हेरिएंट सापडला असून दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगनामध्ये याचे प्रमाण जास्त आहे.