पुणे – मुंढवा भागातील एका पबमध्ये गुंड सचिन पोटे याच्याकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला दोन वर्षानंतर वाचा फुटली. त्याच्याविरोधात ऑनलाइन बेटिंगप्रकरणात खंडणीचा गुन्हा नुकताच दाखल केल्यानंतर पब मालकाने नुकतीच गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. त्यानंतर पोटेसह साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
ऑनलाइन बेटिंगप्रकरणात एकाला धमकावल्याप्रकरणी सचिन पोटे आणि साथीदार अजय शिंदे यांच्याविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यात गुन्हे शाखेने शिंदेला अटक केली होती. मात्र, पोटे पोलिसांच्या हाती लागला नाही. यानंतर पब आणि हॉटेलचा भागीदार नुकताच गुन्हे शाखेच्या युनिट-4 च्या कार्यालयात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांना या प्रकाराची माहिती दिली.
मुंढव्यातील “हॉटेल वायकीकी पब’ मध्ये 15 जून 2018 रोजी पोटे आणि साथीदार पार्टीसाठी आले होते. तेथे येरवडा भागातील एक व्यक्ती आली होती. डीजेने त्या व्यक्तीच्या स्वागताची घोषणा ध्वनीवर्धकावर केली. पबमधील भागीदाराने त्या व्यक्तीचे स्वागत केले. त्यावेळी पोटेला राग आला आणि त्याने पिस्तूलातून त्या व्यक्तीच्या दिशेने गोळीबार केला. यामुळे तेथे जमलेले सर्वजण घाबरले.
त्यानंतर पोटे आणि साथीदारांनी पबची तोडफोड केली. ही घटना सीसीटीव्हीत चित्रीत झाली होती. पुरावा नष्ट करण्यासाठी पोटेने चित्रीकरण करणारे यंत्र (डीव्हीआर) चोरले. या घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन पोटे आणि साथीदार पसार झाले.