पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात झालेल्या गोळीबारांच्या सलग चार घटनांवर दैनिक “प्रभात’ने “नागपूर पॅटर्न चालेना, मुळशी पॅटर्न मात्र जोरात’ असे खरमरीत वृत्त प्रकाशित केले होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याची गांभीर्याने दखल घेतली आहे. शहरातील सराईत तसेच नवोदित गुन्हेगारांच्या नाड्या आवळण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. त्यांनी “पुण्यात आता फक्त कायद्याचाच पॅटर्न चालणार’ असे स्पष्ट करत गुन्हेगारांना थेट इशाराच दिला आहे.
शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, “पोलीस आणि कायद्याचा दणका अगदी खालच्या स्तरापर्यंतच्या गुन्हेगारांना बसेल. यामुळे पुढील काही दिवसांत शहरातील गुन्हेगारीचे चित्र कमी झालेले दिसेल.’ या वेळी अपर पोलीस आयुुक्त(गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे उपस्थित होते.
अमितेश कुमार म्हणाले, “या पुढे कायद्याशी खेळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम राबवली आहे. खंडणी, हत्याराचा धाक दाखवून लुट , वाहन तोडफोड, कोयता आणि शस्त्रांचा वापर करणे हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.
हे प्रकार रोखण्याचा प्रयत्न पोलीस पूर्ण ताकदीने करत आहेत. यासाठी पेट्रोलिंग वाढविण्याबरोबरच जामिनावर सुटलेल्या आणि तडिपार गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. सिग्नलला दमदाटी करुन जबरदस्ती भिक्षा मागणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा लवकरच उगारला जात आहे.’
विशेष मोहिमेत ४२ पिस्तूल जप्त
पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर गुन्हे शाखेने शहरात विशेष मोहीम राबवली. त्यात २८ पिस्तूल आणि ५४ काडतूसे १४ गुन्हेगारांकडून हस्तगत करुन ९ गुन्हे दाखल केले. तर पोलीस ठाण्यांनी १४ पिस्तूल आणि २० काडतूस २८ गुन्हेगारांकडून हस्तगत करुन १९ गुन्हे दाखल केले आहेत.