पुन्हा कोरोनाचा कहर ! राज्यात एका दिवसात दहा हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद

ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच एका दिवसात वाढली रुग्णसंख्या

मुंबई: महाराष्‍ट्रात कोरोना महामारी पुन्हा दिसत आहे. काल शुक्रवारी एका दिवसात राज्यात दहा हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. जवळपास पाच महिन्यानंतर पुन्हा कोरोनाबाधितांचा एका दिवसातील आकडा दहा हजारांच्या वर गेल्याने चिंता वाढली आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 21 लाख 98 हजार 399 झाली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, राज्यात काल, शुक्रवारी 10216 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली तर नवीन 6467 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2055951 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 88838 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.52% झाले आहे, असे टोपेंनी सांगितले आहे.

राज्यात 17 ऑक्टोबर 2020 नंतर काल पहिल्यांदा एका दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा दहा हजारांच्या पुढे गेला आहे. याआधी 17 ऑक्टोबर रोजी 10,259 कोरोना रुग्ण समोर आले होते. काल शुक्रवारी कोविड-19 मुळे 53 लोकांचा मृत्यू झाला. राज्यातील कोरोनामुळे मृतांची संख्या वाढून आता 52,393 झाली आहे.

मुंबईमध्ये शुक्रवारी 1174 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा आता एकूण 3 लाख 31 हजार 020 वर पोहोचला आहे. तर मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत 11,495 लोकांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात काल 849 कोरोनाबाधित समोर आले असून पुण्यातील एकूण आकडा 2 लाख 13 हजार 38 वर पोहोचला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.