राज्य आणि केंद्र सरकारची भीती; उपाययोजना सुरू
पुणे – येत्या काही दिवसात येणाऱ्या थंडीत सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढेल, तसेच दसरा -दिवाळीमुळे नागरिकांची वर्दळ वाढण्याची शक्यता असल्याने करोनाची दुसरी लाट डिसेंबर ते जानेवारीमध्ये येण्याची शक्यता केंद्र शासनाने वर्तविली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती, स्वयंशिस्तीचा आग्रह आणि आरोग्य यंत्रणांच्या सक्षमीकरणावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राव यांनी पत्रकारांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी पालिका आयुक्त विक्रम कुमार उपस्थित होते. राव म्हणाले, जनजीवन पूर्वपदावर येत आहे. सर्व दुकाने, आस्थापना सुरू झाल्या आहेत. यामुळेही गर्दी वाढल्याने काही प्रमाणात करोना बाधितांची संख्या वाढू शकते.
मास्क आणि अंतर राखणे हाच उपाय
करोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेच्या तुलनेत कमकुवत असेल. तीव्रताही कमी असण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. मात्र, ही बाब जर-तरवर अवलंबून आहे. त्यामुळे मास्क वापरणे, योग्य अंतर राखणे हाच हुकमी उपाय असल्याचे राव यांनी सांगितले.