लखनौ – भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री चिन्मयानंद यांच्यावर आपण बलात्काराचा आरोप केला नव्हता, असे त्यांच्यावर आरोप करणाऱ्या शाहजानपूर येथील युवतीने सांगितल्याने या प्रकरणाला न्यायालयात वेगळेच वळण मिळाले आहे.
आपण चिन्मयानंद यांच्यावर कोणतेही आरोप केले नाहीत, असे या युवतीने न्यायालयात येऊन सांगितले. त्यानंतर लगेचच सरकारी पक्षाने कायद्याची पदवीधर असणाऱ्या या युवतीवर फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 340 नुसार गुन्हा दाखल करण्याचा अर्ज दाखल केला.
या अर्जाची प्रत दाखल करून घेण्याचे आदेश देत न्या. पी. के राय म्हणाले, या अर्जाची प्रत पीडिता आणि आरोपीला देण्यात यावी. याबाबतची सुनावणी आता 15 ऑक्टोबरला होणार आहे.
शाहजानपूर येथे चिन्मयानंद याच्या संस्थेमार्फत विधी महाविद्यालय चालवले जाते. तेथे शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचे लैंगिल शोषण केल्याच्या आरोपावरून चिन्मयानंदला गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये अटक करण्यात आली होती. यावर्षी फेब्रुवारीमध्ये चिन्मयानंदला जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला.
सरकारी वकील अभय त्रिपाठी म्हणाले, नवी दिल्ली लोधी कॉलनीतील पोलीस ठाण्यात या विद्यार्थिनीने फिर्याद नोंदवली होती. या मुलीच्या वडिलांनी शहजानपूर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती. ती फिर्यादही मूळ फिर्यादीसोबत जोडण्यात आली होती. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 164 नुसार तिचा जबाब नोंदवण्यात आला होता.
तो एफआयआर प्रमाणेच होता. त्यानंतर काल न्यायालयात तिने आपला जबाब फिरवला. ती विधी शाखेची विद्यार्थिनी असल्याने मी कलम 340 नुसार कारवाईसाठी अर्ज दिला. त्याआधी तपास यंत्रणांनी 33 साक्षीदार आणि 29 कागदोपत्री पुराव्याची तपासणी केली होती.