पुणे – जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने वार करत नंतर डोक्यात दगड घालून त्याला कॅनॉलमध्ये ढकलून दिले. हा प्रकार स्वारगेट परिसरात मंगळवारी रात्री घडला. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला.
शुभम प्रकार रोकडे (वय 24, रा. शाहू वसाहत, पर्वती दर्शन) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी प्रेम ऊर्फ टकल्या प्रताप परदेशी (वय 25), ओंकार ऊर्फ पप्पू शंकर जोशी (वय 22, रा. शिवदर्शन), अक्षय ऊर्फ गोट्या रामदास लोळे (वय 22, रा. पर्वती दर्शन) यांना अटक केली.
शुभम व आरोपी प्रेम व ओंकार हे चांगले मित्र आहेत. दोन दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून त्यांचे भांडण झाले होते. याचा राग मनात धरून आरोपींनी मंगळवारी रात्री शुभमला दारू पिण्यासाठी बोलावून घेतले. त्यानंतर गुटखा खाण्यासाठी त्याला स्वारगेट येथील कॅनॉल परिसरात नेले. तेथे शुभमच्या डोक्यात आणि हातावर वार केले.
त्यानंतर त्याला कॅनॉलमध्ये ढकलून दिले. त्यानंतर आरोपी पसार झाले. नागरिकांनी शुभमला बाहेर काढले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहेत.