अल्पबचत योजना पोस्टाच्या सर्व शाखांत
नवी दिल्ली – ग्रामीण भागातील जनतेला अल्पबचत योजनांचा लाभ घेता यावा, याकरिता पोस्ट विभागाने आता या सर्व योजना शाखा पातळीवरील पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध केल्या आहेत.
पोस्टाची शाखा यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील जनतेला बचतीच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे. ग्रामीण भागात 1.31 इतकी शाखा पोस्ट ऑफिसेस आहेत. ही सर्व बचत योजनांचा लाभ देण्यासाठी काम करू शकतील. आता या ठिकाणी पत्र, स्पीड पोस्ट, पार्सल, इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डर, ग्रामीण पोस्ट विमा योजना या सेवा बरोबरच बचत खाते, रिकरिंग डिपॉझिट, सुकन्या समृद्धी खाते योजना उपलब्ध होणार आहे.
गेल्या 70 वर्षांपासून पोस्ट विभागाने ग्रामीण जनतेच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. पूर्वीच्या काळी तार, पत्र आणि मनीऑर्डरच्या माध्यमातून ग्रामीण जनतेला उपलब्ध केल्या जात होत्या. आता पोस्टाने आधुनिकीकरण करायचे ठरविले आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेला जुन्या सुविधाबरोबरच आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महत्त्वाकांक्षी उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
आता ग्रामीण भागातील पोस्टाच्या शाखांमध्ये पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, मंथली इन्कम योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र, ज्येष्ठ नागरिक बचत योजना इत्यादी सुविधा उपलब्ध होणार आहेत.
अगोदर या योजना फक्त शहरातील पोस्ट कार्यालयामध्ये उपलब्ध होत्या. आता ग्रामीण भागातील पोस्टाच्या शाखातही या योजना उपलब्ध होणार आहेत.त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला छोटी बचत सुरक्षित ठिकाणी ठेवता येईल आणि त्यांची बचतीची सवय वाढेल, अशी आशा पोस्ट विभागाने व्यक्त केली आहे. पोस्ट विभाग एवढ्यावरच थांबणार नाहीत तर ग्रामीण जनतेला या पुढेही अशा प्रकारच्या आधुनिक सुविधा कार्यक्षम पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.