नाशिक : महसूल विभाग हा शासन व प्रशासनाचा कणा आहे. या महसूल वर्षात ‘आठ अ’ हा ऑनलाईन उतारा देण्याची सुविधादेखील सुरू करण्यात आली असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ऑनलाईन महसूल दिन कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री श्री. थोरात, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी कौतुकाची थाप दिली. यासोबत नाशिक विभागातील महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांचा सत्कार करून महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता नाशिक विभागात तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑनलाईन महसूल दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत नाशिक विभागातील सर्व जिल्हे व तालुक्यातील कोतवालांपासून ते अपर जिल्हाधिकारी असे सर्व साधारण अडीच ते तीन हजार महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या नाविन्यपूर्ण कार्यक्रमासाठी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे, महसूल राज्यमंत्री अब्दुल नबी सत्तार सर्व मंत्री महोदयांनी महसूल विभागाला कौतुकाची थाप दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन पद्धतीने आज नाशिक विभागाचा महसूल दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी नागपूर येथून राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक येथून अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, मालेगाव येथून राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून विभागीय आयुक्त राजाराम माने, पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी सर्वश्री सुरज मांढरे, संजय यादव, अभिजीत राऊत, राहुल द्विवेदी, डॉ. राजेंद्र भारूड, उपायुक्त दिलीप स्वामी, रघुनाथ गावडे यांचेसह विभागातील सर्व जिल्ह्यांचे अपर जिल्हाधिकारी यांचेसह सर्व कर्मचारी आदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.
लोकाभिमुख योजना जनतेपर्यंत पोहचविणारा विभाग : महसूलमंत्री थोरात
महसूलमंत्री थोरात म्हणाले, शासनाच्या लोकाभिमुख योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम महसूल विभाग करीत आहे. कोरोनाच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक विभाग व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून साजरा करत असलेला ऑनलाईन महसूल दिनाचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. कोविडच्या काळात महसूल विभाग आपली भूमिका कार्यक्षमपणे पार पाडत असून राज्याचे आर्थिक व्यवहार सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी देखील प्रयत्न करीत आहे. सर्वसामान्य नागरीकांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी महसूल विभाग पार पाडत असतो. असेही मंत्री थोरात यांनी यावेळी सांगितले.
ऑनलाईन महसूल दिन ही आपत्ती काळातील इष्टापत्ती आहे : पालकमंत्री भुजबळ
जिल्ह्याचे पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, 1 ऑगस्टपासून नवीन महसूल वर्षाला सुरूवात होत असते. या महसूल दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराजस्व अभियानाचा देखील शुभारंभ करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण यावर्षी महसूल दिनाचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने साजरा करीत आहोत. यामुळे कोरोना आपत्तीच्या काळामधील ही एक इष्टापत्ती आहे. या नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नाशिक विभागातील साधारण 2 हजार 500 अधिकारी कर्मचारी एकत्र येण्यास मदत झाली आहे. महसूल विभाग हा शासनाच्या पाठीचा कणा आहे, हे या विभागाने जमा केलेल्या महसूलातून सिद्ध होत केले आहे, असेही मंत्री भुजबळ यांनी सांगितले.
सर्वसामान्य नागरिकांना महसूल विभागाच्या माध्यमातून न्याय मिळावा : कृषिमंत्री दादाजी भुसे
मंत्री दादाजी भुसे म्हणाले, महसूल विभाग हा सर्व विभागांचे प्रतिनिधीत्व करीत असून इतर विभागांवर याविभागाचे नियंत्रण असते. येणाऱ्या काळात सर्वसामान्य नागरिकांना महसूल विभागाच्या माध्यमातून न्याय देण्यात यावा. त्याचप्रमाणे महसूल विभागातील अर्धन्यायिक कामकाजासाठी ठराविक कालावधीचे वेळापत्रक असावे, अशी अपेक्षा कृषिमंत्री भुसे यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमादरम्यान महसूल राज्यमंत्री अब्दुल नबी सत्तार यांनी महसूल दिनानिमित्त पाठविलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. लोकांच्या दृष्टीने तसेच प्रशासनात काम करीत असलेल्या अधिकाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या अनेक विषयांचे एकत्रीकरण असलेल्या महत्वाकांक्षी महाराजस्व अभियानाचे औपचारिक उद्घाटनदेखील आजपासून करण्यात करण्यात आले.उपायुक्त दिलीप स्वामी यांनी या कार्यक्रमाच्या निमीत्ताने प्रत्यक्ष व व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंत्री, अधिकारी, कर्मचारी यांचे आभार मानले.