सातारा – जिल्ह्याच्या विविध भागात शनिवारी सकाळपासूनच परतीच्या पावसाने जोरदार सुरुवात केली. दिवसभर अधूनमधून पडणाऱ्या पावसाने रात्रभर चांगलाच जोर धरल्याने शेतीसह पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शनिवारी रात्रभर पडणाऱ्या पावसाचा रविवारी दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात सर्वत्रच जोर कायम होता.
सातारा शहर परिसरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात सलग दुसऱ्या दिवशी परतीच्या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून हातातोंडाला आलेल्या पिकांच्या नुकसानीचा धोका निर्माण झाला आहे. शनिवारी दुपारनंतर सातारा शहर परिसरासह अनेक तालुक्यात पावसाने हजेरी लावली होती. दिवसभर उष्मा जाणवत असल्याने पावसाची शक्यता व्यक्त होत होती.
हवामान विभागानेही पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार शनिवारी दुपारपासून रात्रभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. शनिवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी सध्या सोयाबीन काढणी सुरु आहे. सोयाबीन मळणी करण्यासाठी वेळेत मशीन मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातच सोयाबनीचे ढीग गोळा करुन ठेवले होते.
रात्रभर पडलेल्या पावसामुळे सोयाबीनच हे भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी सकाळपासून हवामान ढगाळ होते. दुपारनंतर पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. रविवारी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत होते. पावसामुळे जिल्ह्यात कोठेही जीवितहानी झाल्याचे वृत्त नसले तरी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साठून राहिल्याने पिकांचे नुकसान होणार आहे.
जिल्ह्याच्या बहुतांश तालुक्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. दुष्काळी तालुक्यांना हा पाऊस उपयुक्त असला तरी जिल्ह्याच्या पश्चित भागातील बटाटा, सोयाबीन, टोमॅटोसाठी हा पाऊस धोकादायक आहे. जिल्ह्यात शनिवारी दिवसभरापासून आज सकाळी 8 वाजेपर्यंत एकूण 359.32 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली असून त्याची सरासरी 32.66 इतकी आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा- 23.41 मि. मी., जावली- 38.3 मि.मी. पाटण- 8.81 मि.मी., कराड- 23.84मि.मी., कोरेगाव- 34.77 मि.मी., खटाव-30.03 मि.मी., माण- 27.14 मि.मी., फलटण- 43.44 मि.मी., खंडाळा- 62.6 मि.मी., वाई – 37.85मि.मी., महाबळेश्वर-29.13.