पुणे, दि. 14 -शहरात शुक्रवारी दुपारी झालेल्या परतीच्या पावसाने पुणेकरांना अक्षरश: घाम फोडला. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दोन तासांत तब्बल 78 मिमी पावसाची नोंद झाली. यंदाच्या हंगामातील शहरातील हा एकाच दिवशी झालेला विक्रमी पाऊस आहे.
दरम्यान, शहराच्या काही भागात मुसळधार, तर काही भागात मध्यम स्वरूपाच्या पडलेल्या पावसाने जवळपास सर्वच रस्ते पाण्याखाली गेले होते. विशेषत: जंगली महाराज रस्ता आणि फर्गसन रस्त्यासह या दोन्ही रस्त्यांना जोडणारे सर्व रस्ते पाण्याखाली गेले होते. या रस्त्यांवर काही भागांत दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साचले होते. अनेक दुकानांमध्ये पाणी घुसले. आपटे रस्ता आणि परिसरातील अनेक रस्त्यांवर पार्किंग केलेल्या दुचाकी पाण्याखाली गेल्या होत्या. अशीच स्थिती पेठांमधील तसेच उपनगरांमधील रस्त्यांची होती. तर या पाण्यामुळे शहरात अनेक भागांत वाहतूक कोंडीही झाली होती.
सुवर्ण मानांकित रस्ते पाण्यात
मागील वर्षी एका स्वयंसेवी संस्थेने “वॉकिंग हॅपीनेस स्ट्रीट सर्व्हे’ केला होता. त्यात नागरिकांशी बोलून रस्त्यांचे मानांकन ठरवले होते. त्यात, जंगली महाराज रस्ता आणि फर्गसन रस्त्यास गोल्डन रॅकिंग मिळाले होते. हे दोन्ही रस्ते करण्यासाठी महापालिकेने जवळपास 50 कोटींचा खर्च केला आहे. मात्र, या रस्त्यांवर पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठीचे नियोजन फसल्याने शुक्रवारी झालेल्या पावसाने या दोन्ही रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. फर्गसन रस्त्यावर साचलेले पाणी या रस्त्याच्या जोड रस्त्यांवरून आपटे रस्ता आणि घोले रस्त्यावर आले. तर या दोन्ही रस्त्यांवरून ते जंगली महाराज रस्त्यावर आले. परिणामी हे सर्व रस्ते दीड ते दोन फूट पाण्याखाली होते. कर्वे रस्ता, पौड रस्ता, शिवाजी रस्ता, नेहरू रस्ता, बंडगार्डन रस्ता, सिंहगड रस्ता, सातारा रस्त्यावरही पाण्याची तळी साचली होती
माजी महापौरांना फटका
शुक्रवारी झालेल्या पावसात पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची गाडी जंगली महाराज रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बंद पडली. त्यामुळे जगताप काही वेळे तेथेच अडकले. महापालिकेत ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवूनच गेली पाच वर्षे स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहराच्या झालेल्या दुरवस्थेचा हा परिणाम असल्याची टीका जगताप यांनी या प्रकारावरून केली आहे.
हंगामातील विक्रम
शुक्रवारी झालेला पाऊस यंदाच्या हंगामातील विक्रमी पाऊस ठरला आहे. या पावसाळ्यात 14 जुलै रोजी 54 मिमी पावसाची नोंद झाली होती. तर 1 ऑक्टोबर रोजी 44 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर आता परतीच्या पावसाने विक्रम केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर भागात 78 मिमी, पाषाण 48 मिमी, चिंचवड 8.7 मिमी तर मगरपट्टा परिसरात 37 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
आणखी दोन दिवस अलर्ट
परतीचा पाऊस आणखी दोन दिवस राहणार असून, हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला “यलो अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे पुणेकरांचा विकेंड घरातच जाण्याची चिन्हे आहेत. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने घाट परिसरात जाऊ नये, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.