नवी दिल्ली – सध्याच्या अस्थिर परिस्थितीत रिटेल गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक वाढवीत आहे. जानेवारी महिन्यात या गुंतवणूकदारांची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक 9.30 टक्क्यांनी वाढली. आता रिटेल गुंतवणूकदारांची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक 23 लाख कोटी रुपयांवर गेली आहे.
गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात या गुंतवणूकदारांची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक 21.40 लाख कोटी रुपये इतकी होती. याच कालावधीत संस्थागत गुंतवणूकदारांची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक झपाट्याने कमी होत असल्याचे दिसून येत आहे. जानेवारी 2023 मध्ये संस्थागत गुंतवणूकदारांची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक कमी होऊन 17.42 लाख कोटी रुपये झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात संस्थागत गुंतवणूकदारांची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक 17.49 लाख कोटी रुपये होती.
म्युच्युअल फंडातील विश्लेषकांनी सांगितले की, किरकोळ गुंतवणूकदार सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक वाढवीत असल्यामुळे म्युच्युअल फंडाकडील मालमत्ता वाढत आहे. जानेवारी महिन्यात एसआयपीच्या माध्यमातून 13,000 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. चार महिन्यापासून एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात होत असलेली गुंतवणूक 13,000 कोटींच्या पुढे आहे.
म्युच्युअल फंड नियंत्रक आणि म्युच्युअल फंड कंपन्यांनी एसआयपीच्या माध्यमातून केलेली गुंतवणूक कशी फायदेशीर ठरू शकते, याबाबत सकारात्मक वातावरण निर्मिती केली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून येते. आता भारतातील म्युच्युअल फंडाकडील कंपन्याकडे व्यवस्थापनासाठी असलेली मालमत्ता वाढून 40.8 लाख कोटी रुपये झाली आहे.
गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात ही मालमत्ता 38.89 लाख कोटी रुपये होती. एका वर्षांत या मालमत्तेमध्ये जवळजवळ 5% वाढ झाली असल्याचे दिसून येते. रिटेल गुंतवणूकदारांची म्युच्युअल फंडात गुंतवणूक वाढत असल्यामुळे म्युच्युअल फंडाकडे असलेल्या एकूण मालमत्तेमध्ये रिटेल गुंतवणूकदारांचे प्रमाण वाढून 57.3% झाले आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात हे प्रमाण 55% होते.
संस्थागत गुंतवणूकदारांचे म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे प्रमाण 42.7% इतके आहे. यामध्ये भारतीय कंपन्यांचे प्रमाण 96% असून उरलेली रक्कम परदेशी गुंतवणूकदाराची आहे. रिटेल गुंतवणूकदार शक्यतो शेअरसंदर्भातील म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. तर संस्थागत गुंतवणूकदार रोखे आणि एक्सचेंज ट्रेड फंडा संदर्भातील म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. रिटेल गुंतवणूकदारांची 80 टक्के गुंतवणूक शेअर संदर्भातील म्युच्युअल फंडात आहे.