मुंबई – अमेरिकेतील व्याजदरवाढीमुळे अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढून चार टक्क्यांवर गेला आहे. अशा परिस्थितीत परदेशी गुंतवणूक भारतात कमी होणार आहे. या कारणामुळे शेअर बाजारात विक्रीचा जोर वाढला असून गुरुवारी शेअर बाजाराचे निर्देशांक एक टक्क्याने कमी झाले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 501 अंकांनी कमी होऊन 58,909 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 129 अंकांनी म्हणजे 0.75 टक्क्यांनी कमी होऊन 17,321 अंकावर बंद झाला.
एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे संशोधन प्रमुख दीपक जसानी यांनी सांगितले की, एकूणच जागतिक शेअर बाजारात नकारात्मक वातावरण असल्यामुळे भारतीय शेअर बाजारावर त्याचा परिणाम होत आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून गुंतवणूक काढून घेत असून काल या गुंतवणूकदारांनी 424 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. त्या अगोदरही या गुंतवणूकदारांनी 4,000 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली होती.