मुंबई – मे महिन्यात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू, गुजरात या उद्योग एकवटलेल्या राज्यासह अनेक ठिकाणी निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे कारखान्यातील कामकाजावर परिणाम झाला आहे. परिणामी मे महिन्यातील मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता कमी झाली झाली असल्याची आकडेवारी समोर आली आहे.
मे महिन्याचा पीएमआय निर्देशांक म्हणजे पर्चेसिंग मनेजर्स इंडेक्स कमी होऊन 50.8 इतका भरला आहे. एप्रिल महिन्यात हा निर्देशांक 55.5 इतका होता. मात्र सुदैवाची बाब म्हणजे हा निर्देशांक अजूनही 50 अंकांच्या वर आहे. हा निर्देशांक 50 अंकांच्या वर असल्यानंतर हे क्षेत्र विस्तारत असल्याचे समजले जाते.
आता बऱ्याच राज्यातील निर्बंध कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे कारखान्यातील कामकाज वाढायला लागेल आणि जूनची आकडेवारी सकारात्मक असेल असे विश्लेषकांना वाटते.
गेल्या वर्षाच्या लॉक डाऊनच्या काळात या निर्देशांकावर यापेक्षा कितीतरी जास्त परिणाम झाला होता. त्या तुलनेमध्ये सध्या होत असलेला परिणाम फारच कमी असल्याचे दिसून येते असे हा निर्देशांक तयार करणाऱ्या आयएचएस मार्कीट या संस्थेने म्हटले आहे.
लवकरच सेवाक्षेत्राचा पीएमआय निर्देशांक जाहीर होणार आहे. रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण चार तारखेला जाहीर होणार आहे. रिझर्व्ह बॅंके या आकडेवारीचा पतधोरण ठरविताना विचार करण्याची शक्यता आहे.