नवी दिल्ली – जीएसटी परिषदेने एसयुव्ही म्हणजे स्पोर्ट युटीलिटी व्हेईकलच्या व्याख्येत वाहन उद्योगाच्या विनंतीनुसार आवश्यक तो बदल केला आहे. त्यामुळे बऱ्याच वाहनांना लागणारा जास्त जीएसटी कमी होणार आहे. या निर्णयाचे वाहन उद्योग आणि स्वागत केले आहे.
जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, आता एसयूव्ही या वाहन प्रकारासाठी चार शर्थीचा समावेश केला असून या चार शर्ती पूर्ण करणाऱ्या वाहनांना एसयुव्ही समजले जाईल आणि त्यांच्यावर 28 टक्के जीएसटीशिवाय 22 टक्के अतिरिक्त अधिभार लावला जाईल.
वाहनांची इंजिन कॅपॅसिटी दीड हजार सीसी पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. दुसरी बाब म्हणजे या वाहनांची लांबी चार हजार मिलिमीटर पेक्षा जास्त असावी लागेल. तर वाहनाचा ग्राउंड क्लिअरन्स 170 मिलिमीटर पेक्षा जास्त असला पाहिजे. या सर्व अटी पूर्ण करणाऱ्या वाहनांना एसयुव्ही समजले जाईल आणि त्यांच्यावर 22 टक्के अधिभार लावला जाईल असे स्पष्ट करण्यात आले.
अगोदर कुठल्या वाहनांना एसयुव्ही समजले जावे यासंदर्भात संदिग्धता होती. त्यामुळे ही संदिग्धता दूर करणारी व्याख्या करण्यात यावी अशी मागणी वाहन उद्योगाने अर्थ मंत्रालय व अवजड उद्योग मंत्रालयाकडे केली होती. अर्थ मंत्रालयाबरोबर झालेल्या चर्चेनुसार या व्याख्येत बदल करण्यात आला असल्याबद्दल वाहन उत्पादकाच्या संघटनेने अर्थ मंत्रालयाचे आभार मानले आहेत