लोणी काळभोर -आई-वडील, भारतीय संस्कृती आणि परंपरेला विसरू नका. पर्सोना म्हणजे आपले व्यक्तिमत्व जगासमोर आणणे होय. एमआयटी एडीटी विद्यापीठ ही स्मार्ट विद्यापीठ म्हणून नावाजली गेली आहे. सगळ्यांवर जगाला शांतीचा संदेश देण्याची ही जबाबदारी आहे. संगीतच्या साधनेमुळे ईश्वर दर्शन आणि शांतीचा अनुभव होतो, असे प्रतिपादन एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी केले.
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नालॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोर यांच्यातर्फे गुरुवार (दि. 13) ते शनिवार (दि. 15) दरम्यान आयोजित चौथ्या पर्सोना टेक्नो कल्चरल फेस्ट 2020च्या उद्घाटन प्रसंगी डॉ. कराड बोलत होते.
यावेळी गायक पद्मश्री अदनान सामी, संगीतकार पद्मश्री पंडित ह्रदयनाथ मंगेशकर, प्रसिद्ध अमेरिकी व्यावसायिक आणि बॅंकिंग गुंतवणुकदार सोनाली वर्मा, फायझरचे माजी संचालक डॉ. मॅक जावडेकर, रॉबर्ट नेईस्मिथ, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, एमआयटी मिटकॉमच्या संचालिका प्रा. सुनीता मंगेश कराड, एमआयटी संगीत कला अकादमीच्या कार्यकारी संचालिका प्रा. ज्योती ढाकणे-कराड, एमआयटी संगीत कला अकादमीचे प्रा. आदिनाथ मंगेशकर, पर्सोना आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. किशोर रवांदे, डॉ. अनंत चक्रदेव आदी उपस्थित होते.
यावेळी पद्मश्री अदनान सामी यांना मेडॉलिक पर्सोना अवॉर्ड 2020 आणि पद्मश्री पंडित ह्रद्यनाथ मंगेशकर यांना आयकॉनिक पर्सोना अवॉर्ड 2020 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरम्यान एमआयटी विश्वशांती संगीत कला अकादमीच्या विद्यार्थ्यांनी कला सादर केली. पर्सोना आयोजन समितीचे अध्यक्ष किशोर रवांदे यांनी प्रस्तावना केली. प्रा. अशोक घुगे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अनंत चक्रदेव यांनी आभार मानले.
शिक्षण पूर्ण करून आपल्यातील क्षमता मजबूत करा आणि जागतिक स्तरावरील स्पर्धकांसोबत स्पर्धा करत रहा. माझा हृदयात भारत आणि भारतीय राहतात. मी सगळ्या धर्मांचे सण साजरे करतो. मुस्लिमांसह सर्व धर्मांच्या नागरिकांना भारतात सन्मान मिळतो. जगात कुठेही गेलात भारतीय संस्कृती आणि परंपरेला विसरू नका.
– आदनान सामी, गायक
हे केवळ टेक्नो कल्चरल फेस्टिवल नसून डिझाइन आणि कला सादर करण्याचे व्यासपीठ आहे. डिझाइन आणि कला हे क्षेत्र देशाच्या अर्थ व्यवस्थेला हातभार लावत आहेत. जागतिक स्तरावरील उत्पादक निर्मितीसाठी आमच्या विद्यार्थ्यांना तयार करण्याचा उद्देश आहे. जगावर अधिराज्य करणारे व्यक्तिमत्व आम्हाला घडवायचे आहे.
-प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्याध्यक्ष एमआयटी एडीटी विद्यापीठ