महापालिका प्रशासनाचा निर्णय : पोलिसांनी दिला होता प्रस्ताव
पुणे – महापालिकेच्या पथविभागाने शहरात प्रायोगिक तत्त्वावर थ्री डी झ्रेबा क्रॉसिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला 25 चौकांत हे क्रॉसिंग होणार आहेत. महत्त्वाच्या चौकांमध्ये थ्री डी झ्रेबा क्रॉसिंग करावेत, अशी शिफारस वाहतूक पोलिसांनी केली आहे. सध्या बीएमसीसी महाविद्यालय चौक, डेक्कन जीमखाना याठिकाणी झेब्रा क्रॉसिंग तयार केले आहेत.
थ्री डी क्रॉसिंगमुळे वाहनचालक वाहनांचा वेग कमी करतील, वाहनचालकांचे यामुळे लक्ष वेधले जाईल आणि वेगाला आळा बसेल. यामुळेच महापालिका प्रशासनाने नोव्हेंबरमध्ये हे क्रॉसिंग तयार केले आहेत.
पथ विभागाच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारच्या क्रॉसिंगमुळे वाहतूक नियंत्रणात येत आहे. त्यामुळेच महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये विविध चौकांमध्ये थ्री डी झेब्रा क्रॉसिंग करण्यासंदर्भात तरतूद केली आहे. यामध्ये लोकमान्य टिळक चौक, स्वारगेट येथील विविध चौक, पुणे स्टेशन, जुना बाजार चौक, वाडीया महाविद्यालय चौक, येरवडा चौक, शास्त्रीनगर चौक यांचा समावेश आहे.
पहिल्यांदा इंग्लडमध्ये प्रयोग
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जगामध्ये पहिल्यांदा इंग्लडमध्ये थ्री डी झेब्रा क्रॉसिंग करण्यात आले. नागरिकांची सुरक्षितता वाहनचालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे क्रॉसिंग महत्त्वाचे आहेत. वाहनचालकांना कोणत्याही बाजूने हे क्रॉसिंग सहज गतीने दिसतात. दिल्लीमध्ये अशा प्रकारचे क्रॉसिंग 2016 मध्ये तयार करण्यात आले आहेत.
प्रशासनाने शहरात थ्री डी क्रॉसिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य चौकामध्ये जास्त वेगाने वाहने चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच वाहतूक पोलिसांकडून यासंदर्भातील माहिती गोळा करण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांशी चर्चा करून चौक अंतीम करण्यात येत आहे.
– व्ही.जी. कुलकर्णी, प्रमुख, पथ विभाग