बापरे! पुण्यात कराेनाबाधित सापडण्याचे प्रमाण आहे ‘इतके’ टक्के

नवे 1,621 करोनाबाधित सापडले, दिवसात 1,256 जण करोनामुक्त आणखी 41 मृत्यू

पुणे – करोना संसर्ग सुरू झाल्यापासून शहरात आतापर्यंत तब्बल सहा लाख संशयितांची नमुने तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 1 लाख 38 हजार 951 जणांना करोनाची लागण झाल्याचे आढळले. तर जवळपास 4 लाख 62 हजार 140 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. म्हणजेच बाधित सापडण्याचे प्रमाण 23.61 टक्के इतके आहे.

 

शहरात दिवसेंदिवस करोना बाधित संख्या वाढत आहे. शुक्रवारी नव्याने 1 हजार 621 बाधित सापडले, तर 1,256 जण करोनामुक्त झाले. गेल्या 24 तासांत 62 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुणे शहर हद्दीतील 41 तर ग्रामीण आणि अन्य जिल्ह्यांतील 21 जणांचा समावेश आहे.

 

7 हजारांवर पोहचलेली चाचण्यांची संख्या मागील आठ दिवसांपासून साडेपाच ते सहा हजारांपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे 1,900 ते दोन हजारापर्यंत पोहचलेली बाधित संख्या आता दीड हजार ते सोळाशे एवढी सापडत आहे. शुक्रवारी (दि. 25) दिवसभरात 6 हजार 142 संशयितांची तपासणी करण्यात आली. शहरात सध्या 17, 773 सक्रिय बाधित असून, त्यातील 949 जण अत्यवस्थ आहेत. त्यापैकी 3,519 जण ऑक्सिजनवर, तर 523 जण व्हेंटिलेटरवर आहेत. गेल्या 24 तासांत व्हेंटिलेटरवरील बाधितांची संख्या वाढली आहे. तर 426 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.

 

दरम्यान, मागील दोन महिन्यांपासून पुणे शहरासह जिल्ह्यात संसर्ग झपाट्याने वाढल्यामुळे जिल्ह्यातील मृतांच्या एकूण संख्येने काल सहा हजारांचा टप्पा पार केला आहे. त्यामध्ये एकट्या पुणे शहरातील 3,296 जणांचा समावेश आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.