पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असणारी एसटीची आंतरराज्य सेवा टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर येत आहे. पुणे विभागातून इंदौर, पणजी, विजापूर आदी ठिकाणी ये-जा करणाऱ्या एसटीच्या फेऱ्यांची संख्या वाढविण्यात येत असून, आता या मार्गांवर पूर्ण प्रवासी क्षमतेने एसटी धावणार आहेत.
लॉकडाऊनमुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या फेऱ्यांना स्थगिती दिली होती. आता अनलॉकमध्ये जिल्हा, आंतरजिल्हा आणि आंतरराज्य प्रवासी वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे. 16 सप्टेंबरपासून पुणे विभागांतर्गत आंतरराज्य मार्गांवर एसटीच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत. यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ होत असून, या गाड्या पूर्ण प्रवासी क्षमतेने चालविण्यात येणार आहेत.
एसटीच्या पुणे विभागातील वाकडेवाडी (शिवाजीनगर), स्वारगेट आणि पिंपरी-चिंचवड बसस्थानकांतून आंतरराज्य वाहतूक होणार आहे. वाकडेवाडी आगारातून (शिवाजीनगर) इंदौर, पणजी, सुरत या मार्गांवर, पिंपरी-चिंचवड आगारातून विजापूर आणि गाणगापूर या मार्गांवर आणि स्वारगेट आगारातून बिदर, गुलबर्गा, विजापूर आणि गाणगापूरसाठी बसेस सोडण्यात येणार आहेत.
यासाठी आरक्षण सुरू झाले आहे. याशिवाय करोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझर असणे बंधनकारक आहे. या प्रवासाचे तिकीट दर जुन्या पद्धतीनेच आकारण्यात येणार आहेत.