पोलीस महासंचालक कार्यालयाची सूचना : रिकाम्या पुंगळ्यांसह द्यावा लागतो हिशेब
– तुषार रंधवे
पिंपरी – पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सरावानंतर शिल्लक राहणाऱ्या काडतुसांच्या उरलेल्या रिकाम्या पितळी पुंगळ्यांचा वापर पोलीसांच्या कार्यालयीन वस्तु तयार करण्यासाठी केला जाणार आहे. यामध्ये कार्यालयीन नामफलक, राजमुद्रा अशा विविध वस्तुंचा समावेश आहे. याकामाकरिता पाच वर्षांच्या कालावधीकरिता हरियाणा येथील एका खासगी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. अपर पोलीस महासंचालक एस. जगन्नाथन यांनी याबाबातच्या सूचना केल्या आहेत.
पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अपवादात्मक परिस्थितीत गुन्हेगारांवर अथवा बचावासाठी गोळीबारदेखील कारावा लागतो. त्यांचा गोळीबाराचा सराव कायम रहावा, याकरिता ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडे पिस्तूल, रायफल आहेत, त्यांना वर्षभरातून एकदा गोळीबाराच्या सरावसाठी ठराविक काडतुसे दिली जातात. दिलेल्या प्रत्येक काडतुसाचा रिकाम्या पुंगळ्यांसह हिशेब घेतला जातो. मात्र, या सरावानंतर मोठ्या प्रमाणावर काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या शिल्लक राहत असल्याची बाब पोलीस महासंचालक कार्यालयाच्या निदर्शनास आली आहे. या रिकाम्या पुंगळ्यांची विल्हेवाट लावण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.
दरम्यान, या पुंगळ्यांचा वापर योग्य कारणासाठी पोलीस कार्यालयांकरिता विविध वस्तू तयार करण्याची चाचपणी करण्यात आली. त्याकरिता राबविलेल्या निविदा प्रक्रियेत हरियाणा येथील मेसर्स पारिक सेल्स कॉर्पारेशन याठेकेदाराची सर्वात कमी बोलीची निविदा प्राप्त झाल्याने, या ठेकेदाराला या वस्तू तयार करण्याचे काम पाच वर्षांकरिता देण्यात आले आहे. या ठेक्यानुसार पोलीस कार्यालयांकडे जमा होणाऱ्या रिकाम्या पुंगळ्या वेळोवेळी पुणे येथील राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.1 च्या समादेशक कार्यालयाच्या मध्यवर्ती साठ्यात जमा करावयाच्या आहेत.
पोलीस कार्यालयांसाठी एक किलो वजनाची वस्तू तयार करण्यासाठी दोन किलो 300 ग्रॅम रिकाम्या पुंगळ्यांची आवश्यकता भासणार आहे. तर हे साहित्य तयार करण्यासाठी लागणारी मजुरी, साहित्याची ने-आण, वाहतूक व इतर कर याचा सर्व खर्च ठेकेदार करणार आहे.
रिकाम्या पुंगळ्यांपासून बनविल्या जाणाऱ्या वस्तू
रिकाम्या पुंगळ्यांपासून पोलीस कार्यालयांच्या वापराकरिता विविध वस्तू तयार केल्या जाणार आहेत. यामध्ये कार्यालयीन नामफलक, राजमुद्रा, फ्लॅग स्टॅण्ड, पितळी साखळी, पितळी पोल, पितळी तोफ, लेक्चर स्टॅण्ड, पितळी कुंडी, मेडल, ट्रॉफी अशा विविध वस्तुंचा समावेश आहे.