पीपीई किट नसतानाही पोलिसांनी भर पावसात पकडले
पुणे – विश्रांतवाडीतील करोना उपचार आणि विलगीकरण केंद्रातून पसार झालेल्या एका रुग्णाला पोलिसांनी पकडले. गुरुवारी मध्यरात्री भरपावसात शोधमोहीम राबवून रुग्णाला ताब्यात घेतले. पोलिसांकडे पीपीई किट नसतानाही त्यांनी धाडस दाखवत रुग्णाला ताब्यात घेतले.
विश्रांतवाडीतील संत ज्ञानेश्वर वसतीगृहात उपचार केंद्र आहे. गुरुवारी रात्रपाळीत गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी उपचार केंद्रातून एक रुग्ण पसार झाला असून त्याचा मोबाइल क्रमांकदेखील बंद असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. त्यानंतर पसार रुग्ण भवानी पेठ भागात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली.
गुन्हे शाखेतील पोलीस नाईक इम्रान शेख, समर्थ पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई चोरमले, कोटलापुरे यांनी पसार झालेल्या रुग्णाचा माग काढण्यास सुरुवात केली. पोलिसांनी मास्क आणि हातमोजे परिधान केले होते. त्याला ताब्यात घेताना काळजी घेण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या.
हा रुग्ण भवानी पेठ भागात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर भर पावसात पोलिसांनी रात्री त्याचा शोध सुरू केला.
अखेर त्याच्या घरापासून काही अंतरावर त्याला ताब्यात घेतले. करोना बाधितांनी संयम बाळगावा. त्यांनी घाबरून जाऊ नये, तसेच उपचार केंद्रातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. उपचार केंद्रातून पसार झाल्यास घबराटीचे वातावरण निर्माण होते, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.