भुवनेश्वर – इतर काही राज्यांप्रमाणे कॉंग्रेसच्या ओडिशा शाखेतील अस्वस्थताही समोर आली आहे. त्या पक्षाच्या काही आमदारांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केली आहे.
ओडिशात नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये कॉंग्रेसची कामगिरी सुमार ठरली. त्याचा संदर्भ घेऊन कॉंग्रेसच्या नऊपैकी चार आमदारांनी प्रदेश संघटनेत व्यापक फेरबदलांची मागणी केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद 74 वर्षीय निरंजन पटनाईक यांच्याकडे आहे. मात्र, ऐन निवडणूक काळात निरंजनबाबू आजारी असतात.
त्यामुळे ओडिशात पक्षाला नवे आणि पर्यायी नेतृत्व मिळावे, अशी भूमिका त्या आमदारांनी घेतली आहे. पक्षाच्या सद्यस्थितीबाबत आणि भवितव्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. ओडिशात 2000 या वर्षापासून बिजू जनता दल सत्तेवर आहे. त्याआधी अनेक दशके कॉंग्रेसची त्या राज्यात सत्ता होती.
मागील विधानसभा निवडणुकीत (2019) कॉंग्रेस पक्ष तिसऱ्या स्थानावर फेकला गेला. प्रमुख विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेसची जागा भाजपने घेतली. त्यामुळे पुढील विधानसभा निवडणूक ध्यानात घेऊन आतापासूनच पक्ष संघटना मजबूत करण्याची गरज कॉंग्रेसचे आमदार अधोरेखित करत आहेत.