25 जिल्ह्यात नवा बाधित नसल्याने दिलासा
रुग्णालयातील 25 जणांसह मुंबईत 59 बाधित
नवी दिल्ली : देशातील करोनाबाधितांची संख्या सोमवारी नऊ हजार 352 वर जाऊन पोहोचली. त्यात 324 मरण पावलेल्या आणि 980 डिस्चार्ज दिलेल्या नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सकाळी दहा वाजता देशातील जनतेला संबोधित करणार आहेत. त्यावेळी देशातील 21 दिवसांचा लॉकडाऊन वाढवायचा की नाही याचा निर्णय जाहीर करतील, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, देशात 15 राज्यातील करोनाचे पुर्वी बाधित आढळलेल्या 25 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांत एकही नवा बाधित आढळलेला नाही, अशी दिलासादायक माहिती आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सोमवारी देण्यात आली. महारष्ट्रात सोमवारी 83 नव्या बाधितांची नोंद करण्यात आली. त्यात मुंबईतील 59 जणांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील बाधितांची संख्या दोन हजार 64 झाली आहे.
मुंबईतील एक रुग्णालयात 25 जणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर त्याच रुग्णालयातील अतीदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मात्र, त्या सर्वांची प्रकृती स्थीर असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चाचणी करण्यात आली. मात्र त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे स्पष्ट करण्यात आले. या बाधितांच्या निकटच्या संपर्कात आलेल्या सर्वांना याच रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. कमी धोकादायक स्वरूपातील संपर्कात आलेल्या सर्वांना घरातच विलगीकरणात राहण्याच्या सुचना देण्यात आल्या अहोत.
दरम्यान कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले. त्यात त्यांनी या काळात गरीबांना भेडसावणऱ्या अन्न धान्याची असुरक्षिततेच्या मुद्याकडे लक्ष वेधले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या प्रमाणे आणखी तीन महिने गरीबांना प्रति व्यक्ती दहा किलो धान्य मोफत द्यावे, असे त्यांनी सुचवले आहे.
धारावीत आणखी चौघे बाधित
मुंबईतील धारावी झोपटपट्टीत सोमवारी आणखी चार बाधित सापडले. त्यामूळे तेथील बाधितांची संख्या 47 वर पोहोचली आहे. जास्त घनतेच्या तेथील लोकवस्तीमुळे करोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंताजनक बनली आहे. दरम्यान लालबागमधील गणेश गल्लीलाही माहापलिका प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले आहे.
करोना चाचणी किट उद्या भारतात
चीनकडून येणाऱ्या करोना चाचणीच्या किटचा पहिला टप्पा उद्या (दि, 15) भारतात येईल. करोना चाचणीसाठी किटची कोणतीही कमतरता पडणार नाही, अशी माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली.
एकट्या न्ययॉर्कमध्ये चीनपेक्षा अधिक बाधित
अमेरिकेत करोनाचा केंद्रबिंदू न्यूयॉर्क शहर बनले आहे. या शहरात सुमारे एक लाखाहून अधिक बाधित आहेत. हा आकडा चीन आणि इंग्लंडमधील बाधितांपेक्षा अधिक मोठा आहे. शहर प्रशासनाने दिलेल्या माहितनिुसार दि. 12 रोजी एक लाख चार हजार 410 बाधित होते. त्यापैकी 27 हजार 676 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर शहरातील मृतांची संख्या सहा हजार 898 आहे.