7 दिवसांत करोनावर मात करत दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह
औरंगाबाद : राज्यात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे दिलासाची बाब म्हणजे, बरे होणारे रुग्ण वाढत आहेत. यात औरंगाबादमधील एका सात वर्षीय चिमुरडीने करोनाविरुद्ध यशस्वी लढा दिला आहे. एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सात वर्षांच्या चिमुरडीचे करोनाचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. औरंगाबादमध्ये एका सात वर्षीय चिमुरडीने करोना विरोधातील लढा यशस्विरित्या दिला आहे. या चिमुरडीचा रिपोर्ट सात दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या मुलीवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
यानंतर 7 दिवसांनंतर या मुलीची पुन्हा तपासणी केली असता रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
विशेष म्हणजे औरंगाबादमधील धूत रुग्णालयाने आतापर्यंत दोघांवर यशस्वी उपचार केले आहेत. यापूर्वी याच रुग्णालयात उपचार घेत असलेली एका 59 वर्षीय महिलाही करोनामुक्त झाली होती. यानंतर आता सात वर्षीय मुलीने कोरोनावर यशस्विरित्या मात केली आहे.
दरम्यान, औरंगाबादमध्ये सोमवारी आणखीन चार करोनाचे रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या 24 वर पोहोचली आहे. नवीन रुग्णांमध्ये प्रत्येकी दोन पुरुष आणि महिला आहेत. या चौघांचेही रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली. या रुग्णांवर घाटी या सरकारी रुग्णालयासह काही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, एका आठवड्यापूर्वी औरंगाबादमध्ये करोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता.