शर्यतबंदीच्या ‘खो-खो’मुळे बैलांचे भाव घसरले

चाकण – पारंपरिक शेतीतील वाढते यांत्रिकीकरण आणि बैलांच्या शर्यतीवरील बंदी यामुळे ग्रामीण लोकजीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या बैलांचे बाजारमूल्य घसरले आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या चाकण येथील बैल बाजारात बैलांचे भाव निम्म्याने खाली आले आहेत. साधारणत: एक लाख रुपये जोडी भाव मिळेल, अशा अपेक्षेने बाजारात बैल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना शर्यतबंदीच्या “खो-खो’मुळे जेमतेम 40 ते 50 हजार रुपये भाव मिळवितानाही कसरत करावी लागत आहे.

पुणे, नगर, सोलापूर, रायगड आणि ठाणे आदी जिल्ह्यांतील हजारो शेतकरी, व्यापारी बैलांची खरेदी-विक्री करण्यासाठी चाकणच्या बैल बाजाराला भेट देत असतात. सध्या सधन शेतकरी ट्रॅक्‍टर व अन्य वाहनांचा, यंत्रांचा शेतीच्या कामासाठी वापर करू लागल्याने बैलांचा शेतीत फार कमी वापर होतो. त्यामुळे प्रामुख्याने शर्यतींसाठी बैलांचा वापर होऊ लागला आहे. चाकणच्या जनावरांच्या बाजारात शर्यतीसाठी बैलजोडी घेण्यासाठी जिल्ह्याच्या विविध भागांतून लोक येत असतात. मात्र, आता बैलगाडा शर्यतीबाबत कमालीची अनिश्‍चितता असल्याने बैलांचे बाजारमूल्य घसरून शेतकऱ्यांसाठी तो “पांढरा हत्ती’ ठरू लागला आहे. याचा थेट परिणाम जनावरांच्या बाजारावर झाला असल्याचे पशुपालक शेतकरी व बैलगाडा मालकांनी सांगितले. गेल्या सहा वर्षांपासून असलेल्या बंदीने, बैलगाडा शर्यती हद्दपार होण्याच्या शक्‍यतेने चाकणच्या बैल बाजारामध्ये शर्यतीच्या खिल्लार, म्हैसूर, गावरान, माणदेशी बैलांची खरेदी-विक्री कमी झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

खिल्लारी, गावरान आदी जातीचे बैल चाकणच्या बाजारात येत आहेत. 20 हजारांपासून लाखांपर्यंतच्या किमतीचे हजारो बैल विक्रीस येत आहेत. मात्र, त्या तुलनेत खरेदीदार नाही.
– बाळशेठ ठाकूर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, खेड

शर्यत सुरू न झाल्याने खासदार बदलला
पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात बैलगाडा शौकीन शेतकरी आपला बैलगाडा पळविण्याचा शौक आहे .मात्र गेल्या काही वर्षापासून पेटा या प्राणीमित्र संघटनेने आक्षेप नोंदविल्याने महाराष्ट्र राज्य सरकारने बैलगाडी शर्यतीवर बंदी आणली. याबाबत विविध पक्षातील नेत्यांनी बैलगाडा सुरू करू अशा वल्गना केल्या मात्र, याबाबत कुणाला यश आले नाही. हा विषय न्यायप्रविष्ट असून त्याचा निकाल कधी लागतो याकडे सर्व बैलगाडा शौकिनांचे लक्ष लागून राहिले आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात याच बैलगाडा शर्यतीमुळे खासदारपदाचा निर्णय वेगळा लागला. गेली काही वर्षे तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी पाठपुरावा केला मात्र, त्यांना म्हणावे तसे यश आले नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.