संग्रहालयाच्या कामात “पुरातत्व’चा हलगर्जीपणा ः उदयनराजे

काम जागतिक दर्जाचे व्हावे ः बाबासाहेब पुरंदरे

सातारा – सात वर्षे झाली तरी शिवाजी संग्रहालयाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण होत नाही हा सर्व पुरातत्व विभागाचा हलगर्जीपणा असल्याचा घणाघात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सोमवारी भेटीदरम्यान केला. साताऱ्यातील शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयाचे काम लवकर पूर्ण करून हे संग्रहालय जागतिक दर्जाचे होईल, या पद्धतीने काम करावे, अशी सूचना ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ बाबासाहेब पुरंदरे यांनी आज येथे केल्या.

श्री. बाबासाहेब पुरंदरे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या आग्रहास्तव आज येथे भेट दिली त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. या संग्रहालयाची माहिती घेऊन त्यात कोणकोणते बदल करावेत, याबद्दलच्या सूचना पुरंदरे यांनी केल्या. डॉ. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी संग्रहालयाची सखोल माहिती घेवून पुरातत्व विभागाला उपयुक्‍त सूचना केल्या. यावेळी बांधकाम विभागाचे उपाध्यक्ष अभियंता आर.टी. अहिरे, छ. शिवाजी संग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक उदय सुर्वे, महावितरणचे उपअभियंता सुनिल माने उपस्थित होते.

खा. उदयनराजे भोसले यांनी पुरातत्व विभागाच्या सुर्वे यांच्याकडून छ. शिवाजी संग्रहालयाच्या आजपर्यंतच्या कामाची माहिती घेतली. किती जागा आहे, किती फंड आला, कशी संरचना करण्यात आली, किती वेळात काम पूर्ण करण्यात आले, कोणत्या कामास सध्या निधी अपुरा आहे, अजुन किती निधीची गरज आहे याची माहिती उदयनराजे यांनी घेत बांधकाम व पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना आपल्या शैलीत कानपिचक्‍या दिल्या. इमारतीचे काम 2008 साली पूर्ण झाले आहे. मात्र अंतर्गत सजावटीला वेळ लागला आहे, असे उत्तर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी देताच उदयनराजेंनी संबंधितांना फैलावर घेतले. सात वर्षे काम रखडले. सात वर्षात सात पोरे झाली असती म्हणजे तुम्ही कामात हलगर्जीपणा करत आहात. नुसत्या मंजुुऱ्या घेवून फायदा काय? तुम्हाला पाठपुरावा करता येत नाही काय? या उदयनराजेंच्या प्रतिप्रश्‍नांवर सरकारी अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली.

मुंबई येथील म्युुझिअमला भेट देवून बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी चर्चा करुन अंतर्गत सजावटीचे काय ते ठरवा असे उदयनराजे यांनी ठामपणे सुनावले. मी या कामासाठी विरोध करतोय असे भासवले जाते. माझ्यावर टीका केली गेली की हे काम आम्ही आणलंय. पण तसे काही नाही. कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा हे संग्रहालय राजवाड्यात स्थलांतरीत करा. या इमारतीचे बांधकाम 5 कोटीत झाले. तेवढ्या खर्चात राजवाड्याची डागडुजी झाली असती. चार एकराऐवजी सात एकरात हे संग्रहालय उभे राहिले असते. जे झाले ते झाले. पंधरा दिवसात सर्व प्रस्ताव मंजूर झाले पाहिजेत. त्यासाठी दोन दिवसात पत्रव्यवहार करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना भेटणार असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले. ज्या पद्धतीने औंध संग्रहालयात गर्दी होते तशीच गर्दी येथे झाली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.