लाचखोरांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्नशील

अप्पर अधीक्षक सुषमा चव्हाण; त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करणार

पोलिसांचा जनतेशी संबंध येत असल्याने…

एसीबीकडून इतर विभागांच्या तुलनेने पोलीस दलाच्याच जास्त कारवाया होतात व कारवाया झाल्यानंतरही कोठडी मिळण्याचे प्रमाणही पोलिसांवरील कारवायामध्येच जास्त असल्याचे निदर्शनास आणल्यानंतर सुषमा चव्हाण म्हणाल्या, ‘आम्ही तक्रार आल्यानंतर काम करतो. मग ती कोणाचीही असो. मात्र, पोलीस दलाचा जनतेशी जास्तीचा संबंध येत असल्याने कदाचित त्या विभागातील सापळ्यांचे प्रमाण जास्त असू शकते. तसेच कोठडी देण्याचा अधिकार आमचा नसून न्यायालयाचा असतो.’

सातारा – साताऱ्याच्या एसीबीचे काम चांगले असून लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडलेल्या पण कायद्याच्या आधारावर मोकाट राहणाऱ्या लाचखोरांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पुणे विभागाच्या अप्पर अधीक्षक सुषमा चव्हाण यांनी सांगितले. शासकीय विश्रामगृहावर माध्यमांशी त्या बोलत होत्या. यावेळी सातारा एसीबीचे उपाधीक्षक अशोक शिर्के उपस्थित होते.

यावेळी चव्हाण म्हणाल्या, “”साताऱ्यासह सांगली, कोल्हापूर एसीबीकडून सापळा कारवाईचे प्रमाण चांगले आहे. मात्र, गुन्ह्याच्या कामात राहिलेल्या किरकोळ त्रुटी तसेच काही कायदेशीर पळवाटांचा आधार घेवून लाचखोर मोकाट राहत असल्याचे वास्तव आहे. या त्रुटींचा अभ्यास करून एसीबी भविष्यात संशयितांना जास्तीत जास्त शिक्षा कशी लागेल, यासाठी प्रयत्न करेल.” तसेच लाचेच्या गुन्ह्याचा निकाल दोन वर्षांत लागावा, यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगतानाच लवकरच सरकारी वकिलांशी सल्लामसलत केली जाईल, असेही त्या म्हणाल्या. इतर सरकारी विभागातील लोकांना पकडण्याचे अन्‌ पोलीस दलातील संशयितांचे प्रमाण यात तफावत असल्याचे विचारताच त्या म्हणाल्या,

‘आम्ही कोणालाही टार्गेट करायचे म्हणून कारवाई’ करत नाही. ज्यांच्याविरोधात तक्रार येईल त्या तक्रारीची पडताळणी करूनच त्यांच्यावर कारवाई केली जाते. पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी कारवाईच्यावेळी सक्षम अधिकारी म्हणून लगेच मंजुरी देतात. मात्र, बाकी विभागाचा अनुभव चांगला नसल्याचे त्यांनी यावेळी नमूूद केले. सातारा एसीबीने सन 2018 मध्ये 29 तर 2019 मध्ये 9 ट्रॅप केले आहेत, असे कौतुक त्यांनी केले. सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी लोकांना दिसेल अशा ठिकाणी एसीबीचे फलक लवावेत, तसेच कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास तात्काळ एसीबीकडे तक्रार देण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.