पुणे – केंद्र व राज्य शासनाच्या पेन्शनधारकांना हयातीचा दाखला (जीवन प्रमाणपत्र) देण्यासाठी शहरातील ग्रामीण भागासोबतच शहरातील पोस्ट ऑफिसमध्येही ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, शहरातील मध्यवर्ती भागातील सिटी पोस्टाच्या कार्यालयासह 20 सलग्न कार्यालयात इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने शहरातील पेन्शनधारकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सकाळी आठपासूनच हजेरी लावलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना सिटी पोस्टात दिवसभर नेटवर्क नसल्याचे सांगत त्यांना संध्याकाळी पुन्हा घरी पाठवून दिले जात आहे. तर नेटवर्क सेवा सुरू झालीच तर केवळ पोस्ट विभागाच्या सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जात असल्याने इतर विभागातील कर्मचाऱ्यांची वादावादी होत आहे. मात्र, ऐन दिवाळीत ही समस्या उद्भवल्याने अनेक पेन्शनधारकांना अद्यापही पैसे मिळालेले नाहीत.
काय आहे नेमकी अडचण?
नोव्हेंबर महिन्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना “जीवन प्रमाणपत्र’ देणे आवश्यक असते आणि त्याची सोय पुणे सिटी पोस्ट खात्यात सुरू केली आहे; पण आता या प्रक्रियेला आठ दिवस होत आले तरी अजूनही प्रक्रिया सुरळीत झालेली नाही. शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात पेन्शनधारक राहत असल्याने अनेक ज्येष्ठ नागरिक या पोस्ट कार्यालयास प्राधान्य देतात.
मात्र, या ठिकाणी इंटरनेट सेवा बंद असणे, नेटवर्क न मिळणे, नेटवर्कसह कॉम्पुटर हॅंग होणे, ज्यांच्या अंगठ्याचे ठसे येऊ शकत नाही, त्यांच्यासाठी “आय स्कॅन’ केले जाते; पण त्यासाठी यंत्रणा अजूनही उपलब्ध नाही. केवळ हाताच्या बोटांचे ठसे घेतले जात आहेत. मात्र, ज्यांचे ठसे मिळत नाहीत, त्यांना “जीवन प्रमाणपत्रांसाठी पुन्हा बोलावले जात आहे.
या दाखल्यांसाठी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत या प्रक्रियेसाठी वेळ देण्यात आली असली तरी लवकर काम व्हावे या उद्देशाने ज्येष्ठ निवृत्तीधारक सकाळी 8 वाजल्यापासूनच रांगेत येतात, दिवसभर थांबूनही काम होत नसल्याचे चित्र आहे.
“बीएसएनल’च्या एका प्रोग्राम तपासणीचे काम सध्या चालू असून, या तपासणीमुळे नेटवर्कमध्ये अडचणी येत आहे. याबाबत सातत्याने बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे; पण त्यांच्याकडून विशेष प्रतिसाद मिळत नाही. नेटवर्कबाबतची ही समस्या दिल्लीपर्यंत पोहोचवली आहे. लवकरच ही समस्या सुटून सेवा पुन्हा कार्यरत होईल. खडकवासला येथील समस्या नुकतीच दूर झाली आहे.- एस. आर. साबळे, सहायक अधीक्षक, पुणे शहर (पश्चिम विभाग)