पुणे – दिवाळीनिमित्त शहरासह उपनगरांमध्ये खरेदीचा उत्साह असून, बाजारपेठा गजबजल्या आहेत. मात्र, इंधन दरवाढ, जीएसटी यामुळे दिवाळीसाठी बेसन पीठ, रवा, मैदा, साखर, डाळींच्या भावात गेल्या वर्षीच्या तुलनेने 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा दिवाळीचा फराळ महागच असण्याची चिन्हे आहेत.
फराळासाठी चनाडाळ, पोहे, रवा, मैदा, बेसन, खोबरे, भडंग, शेंगदाणा, खाद्यतेल, साखर, गुळ, मसाले, लाल तिखट आदी वस्तूंना मागणी असते. घाऊक बाजारातून शहर, उपनगर आणि जिल्ह्यातील अनेक छोटे-मोठे व्यापारी दिवाळी फराळासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी मार्केटयार्डातून करत आहेत. बाजारात फराळाच्या वस्तूंची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे मागणीत यंदा वाढ झाली आहे.
“सद्य:स्थितीत राजस्थान आणि गुजरात या दोन राज्यांतून संपूर्ण देशात शेंगदाणे पाठविले जात आहेत. दिवाळीमुळे मागणी वाढताच मागील दोन दिवसांत शेंगदाणाच्या दरात किलोमागे 2 ते 3 रुपयांनी वाढ झाली आहे. तर, कारखाने सुरू झाल्यानंतर उत्पादन वाढल्यास साखरेचे भाव कमी होण्याची शक्यता आहे,’ असे गुळ-भुसार बाजारातील साखरेचे व्यापारी ईश्वर नहार यांनी सांगितले.
“दिवाळी फराळासाठी लागणाऱ्या रवा, मैदा, डाळी, बेसन पिठाच्या भावात गेल्या दोन महिन्यांत 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दिवाळीसाठी इतर आवश्यक वस्तूंचे भाव टिकून आहेत. पगाराच्या पहिल्या दहा तारखेच्या आत दिवाळी आल्याने यंदा दिवाळीत खरेदी वाढेल.” – सुमित गुंदेचा, घाऊक मालाचे व्यापारी, मार्केट यार्ड
“यंदा उलाढाल वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीमुळे खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढली आहे. फराळासाठी आवश्यक तेल, साखर, डाळी, शेंगदाणे, सुका मेवा आदी अन्नधान्य खरेदीसाठी ग्राहकांची संख्या वाढली आहे.” – प्रशांत गोते, गुळ-भुसार विभागप्रमुख, पुणे बाजार समिती
फराळाच्या वस्तूंचे किरकोळ
दुकानातील भाव (1 किलो)
वस्तू 2022 2023
रवा- 35 40
मैदा- 35 40
बेसन – 96 100
पिठीसाखर – 52 48
वनस्पती तूप- 160 120
भाजका पोहा- 74 70
पातळ पोहा – 55 65
मका पोहा – 64 65
नायलॉन पोहा- 60 60
भडंग – 100 120
खसखस – 1860 1460
फुटाणा डाळ – 84 120
चारोळी – 1480 1700