लेफ्टनंट जनरल ए.के.सैनी : प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कर सज्ज
पुणे – देशाच्या दक्षिण आणि भारत-पाक सीमेवरील “सर क्रिक’ या खाडी भागांत काही बोटी आढळल्या आहेत. दक्षिणेकडील राज्यांत किंवा दक्षिण द्वीपकल्पात दहशतवाद्यांकडून हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती लष्कराला गुप्तवार्ता विभागाकडून मिळाली आहे. दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेत खबरदारीच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. या भागातील लष्करी क्षमतेतही वाढ करण्यात आली आहे. दहशतवादी हल्ला परतवून लावण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णत: सक्षम आहे, असे लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी म्हणाले. आर्मी लॉ कॉलेजच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन सैनी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
दहशतवादी संघटनांनी लक्ष्य ठेवले असले, तरी आम्ही त्यांचा यशस्वी प्रतिकार करण्यासाठी सज्ज आहोत. सर क्रीकबाबत दोन्ही देशात वाद असून त्याचा निर्णय सरकारी पातळीवर होईल. त्यामुळे या भागाविषयी कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. दहशवादी हल्लाचा धोका लक्षात घेऊन लष्करातर्फे उपाय योजना आखण्यात येत आहेत. त्यामुळे दहशतवादी संघटनांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत, असे सैनी म्हणाले. अपारंपरिक संघर्षाशी (सबकन्व्हेन्शनल कॉन्फ्लिक्ट) संबंधित कोणत्याही गोष्टीला अंतर्गत आणि बाह्य कारणे असतात. जम्मू काश्मीरबाबत अंतर्गत मुद्द्यांपेक्षा बाह्य घटकच अधिक कारणीभूत असल्याचे दिसते. त्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट आहे. जम्मू काश्मीरमध्ये उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कर पूर्णपणे तयार आहे, असे सैनी यांनी नमूद केले.